-->

Ads

साखर झोपेत काळाचा घाला, घराचा स्लॅब कोसळून आजोबा अन् तीन वर्षांच्या चिमुकल्याने जीव गमावला

Grandfather And Grandchild Died: आजी-आजोबा आणि तीन वर्षांचा नातू साखर झोपेत असताना अचानक घराच्या स्लॅब कोसळला. या घटनेत आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे.




नाशिक: जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्याील नळवाड पाडा येथे गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घराचा स्लॅब कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे गुलाब वामन खरे यांच्या घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्याखाली तीन जण दाबले गेले. या दुर्दैवी घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर घराच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या आजीला दिंडोरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी तत्परता दाखवित जेसीबीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

भर झोपेत असताना विठाबाई वामन खरे (वय ८०), गुलाब वामन खरे (६० वर्ष), निशांत खरे (३ वर्ष) यांच्या अंगावर स्लॅबचा काही भाग पडला. यात गुलाब वामन खरे आणि निशांत विशाल खरे यांचा मृत्यू झाला असून विठाबाई खरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच नळवाड पाडाचे सरपंच हिरामण गवळी यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह आणि काही ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.

स्लॅबचा मोठा भाग पडलेला असल्यामुळे सरपंच हिरामण गावीत यांनी जेसेबी बोलावून मदत कार्यास प्रारंभ केला. तहसीलदार पंकज पवार यांनी तत्काळ घटनास्थळी जात आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ कारवाई केल्याने ढिगार्‍याखाली अडकलेल्या आजीची सुखरुप सुटका करण्यात यश आली. आजोबा आणि नातू हे स्लॅबखाली पूर्णपणे दाबले गेल्याने त्यांचे डोके आणि शरीर पूर्ण दाबले गेल्याने जागीच मृत्यू झाला आहे. जखमी विठाबाईस उपाचारासाठी आणि मृतांना शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments