लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागून ३० ते ४० दुकाने भस्मसात झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती.
पुणे : लष्कर भागातील फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात आणून घरी निघालेल्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्याचा पीएमपी बसच्या धडकेने दुर्देवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी अधिकाऱ्याच्या कुटुंंबीयांना नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित केलेल्या लोकअदालतीत दावा तडजोडीत काढण्यात आला असून, अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ८४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात आग लागून ३० ते ४० दुकाने भस्मसात झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. पुणे कटक मंडळाच्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांनी आग आटोक्यात आणली होती. आग आटोक्यात आणल्यानंतर पहाटे घरी निघालेल्या अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या दुचाकीला लोहगाव परिसरात भरधाव पीएमपी बसने धडक दिली होती. अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात ॲड. सुनीता नवले यांच्यामार्फत गो डिजिट इन्शुरन्स कंपनीच्या विराेधात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. अग्निशमन दलातील अधिकाऱ्याचे वेतन दरमहा ९० हजार रुपये होते. अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीत अग्निशमन दलातील अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना ८४ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. गो डिजिट इन्शुरन्स कंपनीचे सुखप्रीतसिंग, अमृता सिन्हा यावेळी उपस्थित होते. कंपनीकडून ॲड. द्रविड यांनी काम पाहिले.
0 Comments