डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळी देखील पाऊस पडला. या दरम्यान एक जीर्ण झालेली इमारत कोसळली आहे. ही इमारत तीन मजली होती. या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. ही इमारत आज अचानक जमीनदोस्त झालीय.
केडीएमसीच्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर अनेक कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु झालं. बचाव पथकाकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
‘प्रशासनाने नागरिकांना बाहेर काढलं, पण…’
कल्याण डोंबिवली महापालेकिचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेवर माहिती दिली. “ही इमारत खचत आहे, असं समजल्यानंतर आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढलं. पण तरीही दोन जण अडकल्याची माहिती समोर आलीय”, असं केडीएमसी आयुक्तांनी सांगितलं.
“एक 70 वर्षाच्या वयोवृद्ध आहेत. तर दुसऱ्या 45 वर्षीय महिला आहेत. त्यादेखील आजारी आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढता आलं नाही. बचाव कार्य सुरु करण्यात आलंय. या दुर्घटनेत ते जखमी झाले असतील तर तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात येतील”, असं केडीएमसी आयुक्तांनी सांगितलंय.
“ही इमारत धोकादायक होती. या इमारतमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना याआधी नोटीस देण्यात आली होती. लोकांना बाहेरही काढण्यात आलं होतं. पण ते पुन्हा तिथे वास्तव्यास गेले. त्यानंतर आज ही दुर्घटना घडलीय. आजूबाजूच्या इमारतीदेखील खाली करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीदेखील निष्कलीत अर्थात पाडून टाकण्यात येतील”, अशी प्रतिक्रिया केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
0 Comments