-->

Ads

वाहनतळ बंद करण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराला लोखंडी द्वार

वाहन चालकांना तेथे वाहने उभी करू नका सांगूनही ते दाद देत नसल्याने अखेर डोंबिवली रेल्वे प्रशासनाने विष्णुनगर बाजूकडील प्रवेशद्वाराजवळ लोखंडी द्वार बसून घेतले आहे.

डोंबिवली- डोंबिवली रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजुकडील भाग रस्त्यालगत असल्याने अनेक प्रवासी विशेषकरुन मुंबईत परिसरात नोकरी करणारे पोलीस रेल्वे स्थानकातील फलाटाजवळ, रेल्वे तिकीट खिडकी जवळील मोकळ्या जागेत दुचाकी वाहने आणून उभी करत होते. या वाहन चालकांना तेथे वाहने उभी करू नका सांगूनही ते दाद देत नसल्याने अखेर डोंबिवली रेल्वे प्रशासनाने विष्णुनगर बाजूकडील प्रवेशद्वाराजवळ लोखंडी द्वार बसून घेतले आहे.

या लोखंडी द्वारामुळे दररोज पहाटेपासून विष्णुनगर बाजुकडील रेल्वे तिकीट खिडकीच्या समोर प्रवाशांकडून विशेषता पोलीस, रेल्वे कर्मचारी, पोलिसांकडून दुचाकी आणून उभ्या करुन ठेवल्या जात होत्या. त्यांचा स्थानकात येण्याचा मार्ग द्वारावर लोखंडी अडथळा उभा केल्याने बंद झाला आहे. काही रिक्षा चालक पहाटेच्या वेळेत स्थानकाच्या आतील भागात येऊन सामान, मासळीच्या टोपल्या फलाटावरुन थेट वाहनात टाकत होते.

रेल्वे स्थानकात प्रवेश केल्यावर समोरच दुचाकी वाहनांचा अडथळा असल्याने प्रवाशांना येजा करताना त्रास होत होता. विष्णुनगर बाजू आणि दिनदयाळ चौकासमोरील रेल्वेच्या जागेत दुचाकी वाहने रेल्वे कर्मचारी, पोलीस गुपचूप आणून उभे करत होते. सकाळी वाहन उभे करुन ठेवायचे आणि संध्याकाळी कामावरुन परतल्यावर घेऊन जायचे अशी या कर्मचाऱ्यांची पध्दती होती.

रेल्वे सुरक्षा बळाचे जवान या प्रकाराने हैराण होते. वाहतूक विभागाला कळवून ही सर्व वाहने रेल्वे पोलिसांनी उचलली होती. तरीही कर्मचारी ऐकत नव्हते. अखेर रेल्वे प्रशासनाने डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकातील विष्णुनगर बाजूने प्रवाशांच्या येजा करण्याच्या मार्गात लोखंडी द्वार बसून घेतले. या द्वारातून फक्त प्रवासी ये-जा करू शकतात. रेल्वेचे वाहन फलाटात आणायचे असेल तर द्वाराचे कुलूप उघडण्याची सोय करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकालगत कोपर पुलाजवळ रेल्वेचे प्रशस्त वाहनतळ आहे. याठिकाणी भाडे द्यावे लागत असल्याने ते टाळण्यासाठी काही कर्मचारी रेल्वेच्या मोकळ्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी करत होते.









Post a Comment

0 Comments