Shocking News: शेतातून काही गावकरी जात होते. तेवढ्यात त्यांना कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. आवाज कुठून येत आहे हे कळत नव्हतं, मग लक्षात आलं की हा आवाज जमिनीखालून येत आहे.
कानपूर: गावातील शेतात जमिनीत गाडलेले जिवंत नवजात अर्भक गावकऱ्यांना सापडले. या घटनेने साऱ्या गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मुसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलंदर गावचं हे प्रकरण आहे.
त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून माती बाजुला केली आणि बाळाला बाहेर काढले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तसेच, बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळ निरोगी असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुमारे ८ ते ९ तासांपूर्वी मुलाचा जन्म झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सीओ रविकांत गौर यांनी सांगितले की, पुलंदर गावातील लोक शेताकडे जात होते. यावेळी त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांना जमिनीखालून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचं त्यांनी पाहिले. यानंतर लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून बाळाला देवीपूर रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. बाळ निरोगी आहे. त्याच्या देखभालीसाठी CWC कानपूर देहाटला ही माहिती देण्यात आली आहे. तसेच गावप्रमुखाच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात येत आहे.
0 Comments