-->

Ads

Kalyan Crime News: बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात; पोलीस असल्याची बतावणी करत दुकानदाराला गंडा

Kalyan News बंटी बबली पोलिसांच्या ताब्यात; पोलीस असल्याची बतावणी करत दुकानदाराला गंडा


कल्याण : डोंबिवलीतील एका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करत महिलेने आपल्या पतीसोबत एका सायकल दुकानदाराला गंडा घातल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली होती. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत कोळशेवाडी पोलिसांनी गंडा घालणाऱ्या तोतया महिलेसह तिच्या पतीला बेड्या ठोकल्या. या दोघांनीही कल्याणसह आसपासच्या शहरात  देखील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरातील एका सायकलच्या दुकानात एक महिला व पुरुष सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले. सायकल घेतल्यानंतर त्यांनी तीस हजार रुपयांचा चेक दिला. महिलेने मी डोंबिवलीतील विश्वनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तर तिच्यासोबत असलेल्या इसमाने आपण बँकेत कॅशियर असल्याचे सांगितले. या दोघांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सायकल दुकानदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने पर्स गाडीत विसरल्याचे सांगत दुकानदाराकडून दहा हजार रुपये मागितले. त्यानंतर अडीच हजार रुपये फोन पे वर मागितले. दुकानदाराने पैसे देऊ केले. 

बरेच दिवस उलटूनही पैसे परत न दिल्याने दुकानदाराला संशय आला. त्यांनी दिलेला चेक देखील दुसऱ्याच्या नावे असल्याने आपली फसवणूक झाल्याचे दुकानदाराचे लक्षात आले. दुकानदाराने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कोळशेवाडी पोलिसांनी या दोघा बंटी बबलीचा तपास करत बेड्या ठोकल्यात. कविता आचरे व संजय आचरे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. दोघे पती पत्नी असून या दोघांनी कल्याणसह डोंबिवली व आसपासच्या शहरात पोलीस असल्याचे बतावणी करत अशाच प्रकारे काही जणांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.



Post a Comment

0 Comments