Pune Crime News : पुणे, बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडीवर दुसरी गाडी आदळली. हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला आहे. या प्रकरणात चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
पुणे | 27 ऑगस्ट 2023 : महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. अनेक अपघात वाहतुकीसंदर्भातील नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. कधी मानवी चुकांमुळे अपघात होतात. देशात अपघातात जीव गमवणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अपघात कमी करण्यासंदर्भात वारंवार चर्चा होत असते. परंतु ठोस उपाययोजना होत नाही. आता पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सातारा शहराच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटल्यामुळे भरधाव असलेली गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली. या अपघातात निखिल शशिकांत चौखंडे ( वय 30), प्रियांका निखिल चौखंडे (वय 25) हे पती पत्नी जागीच ठार झाले. तसेच शशिकांत यदुनाथ चौखंडे (वय 63) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. सर्व राहणारे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे. या भीषण अपघातात चार जण जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहतुकीची कोंडी
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला केले. या अपघातात टायर फुटलेली गाडी ज्या वाहनावर अडकली ते वाहन रस्त्यावर वाहन उभे होते. रस्त्यावरुन प्रवासी घेण्यासाठी ते थांबले होते. या गाडीचा चालक फरार झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांची नावे मिळाली नाहीत.
चौखंडे कुटुंबीय गावी जात होते
मिळालेल्या माहितीनुसार चौखंडे कुटुंबीय मुंबईवरुन आपल्या गावी जात होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यामुळे ते गावी जात होते.
दुसऱ्या अपघातात युवक जागीच ठार
यवतमाळमध्ये ट्रॅक्टर दुचाकीचा अपघात झाला. ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालक शंकर मोथळे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments