-->

Ads

क्रूरतेचा कळस! मांजरीसोबत खेळतो म्हणून महिलेने कुत्र्यावर फेकले अ‍ॅसिड

Mumbai Crime News : महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.


Mumbai News : मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मालवणी परिसरातील गायकवाड नगरमधील स्वप्नपूर्ती इमारतीतील एका महिलेने इमारतीतील श्वानावर अॅसिड फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे हे कृत्य इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

याप्रकरणी मालाड मालवणी पोलीस ठाण्यामध्ये महिलेविरोधात कलम 429 भादवी सह कलम 11(1) (अ) प्राण्याना क्रुरतेने वागण्याचे प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 सह कलम 119 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबीस्ता सुहेल अन्सारी असं श्वानावर अॅसिड हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मालवणी गायकवाड नगर परिसरात 16 ऑगस्टच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शबीस्ता सुहेल अन्सारी यांच्या मांजराबरोबर ब्राउनी नावाचा श्वान इमारतीच्या गेटजवळ खेळत होता. मांजर आणि श्वान यांची मस्ती चालू असताना श्वान त्या मांजरीच्या मागे देखील लागायचा.

मात्र हे शबिस्ता अन्सारी हिला आवडत नसेल यामुळे रागात तिने ब्राउनी या श्वानावर अॅसिड हल्ला केला. या अॅसिड हल्ल्यात श्वानाला गंभीर इजा झाली असून त्याच्या डोळ्याला देखील जखम झाली आहे.

यामुळे बाळासाहेब तुकाराम भगत यांनी या महिलेविरोधात मालवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. बाळासाहेब भगत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहिस्ता अन्सारी या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




Post a Comment

0 Comments