-->

Ads

डोंबिवलीत दाम्पत्याचे घर 'साफ', मोलकरणीचा अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला, चोरीची टेक्निक अचंबित करणारी

 Dombivli Crime: वृद्ध महिला पतीसोबत खरेदी करण्यासाठी बाहेर गेली अन् घरात चोरी झाली. पोलीस तपासात मोलकरणीनेच चोरी केल्याची धक्कादायक बाब आली समोर. तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


डोंबिवली : घरकाम करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवायची आणि त्याच घराची बनावट चावी बनवून घर साफ करायचे असा फंडा वापरणाऱ्या महिलेला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलेला अटक करण्यात आली आहे. सीमा उर्फ नेहा सदानंद ढोलम (वय ४१, रा. न्यू सुरज सोसायटी, मद्रासी मंदीराजवळ, राजाजी पथ, डोंबिवली-पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा मिळून दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.याबाबत अधिक माहिती अशी की, राजाजी पथावर असलेल्या मैत्री नभांगण सोसायटीत राहणाऱ्या छाया प्रकाश साळवी (वय ७०) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास छाया साळवी या त्यांचे पती प्रकाश यांच्यासमवेत चार रस्ता येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी बनावट चावीच्या साह्याने साळवी यांच्या दाराचे कुलूप उघडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम या महिलेला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, तिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम ही २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान छाया साळवी यांच्याकडे घरकाम करत होती. घरकाम करण्याच्या बहाण्याने तिने घरात ओळख वाढवली. त्यानंतर संधी मिळताच त्याच घराची बनावट चावी बनवून घरातील रोकड व दागिने लंपास केले होते.आरोपी मोलकरीन सीमा हिचे पती नेहमी आजारी असतात. तसेच सीमा हिला महागडे कपडे आणि दागिने घालण्याचा देखील शौक आहे. मात्र, त्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तिने चोरीचा मार्ग पत्करला होता. अशाच पद्धतीने तिने याआधी देखील एका घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.अटक केलेल्या आरोपी सीमाकडून पोलिसांनी आतापर्यंत १५ हजारांची रोकड, २१.८८० ग्रॅम वजनाचा हार, १.८६० ग्रॅम वजनाची अंगठी, १४.९१० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दोन बनावट चाव्या, असा एकूण दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments