महाविद्यालयात शिकत असताना एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन मित्रांत वाद झाला. प्रेमाच्या त्रिकोणातून पाच ते सहा युवकांनी वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून केला.
नागपूर : महाविद्यालयात शिकत असताना एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन मित्रांत वाद झाला. प्रेमाच्या त्रिकोणातून पाच ते सहा युवकांनी वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजता हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरगावात घडली. सक्षम ऊर्फ शशांक कैलास तिनकर (शिरुड, रिधोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बादशहा ऊर्फ सौरभ पंधराम (१९, चिंचभवन) आणि शशांक यांची मैत्री होती. दोघेही एका महाविद्यालयात शिकत होते. दोघेही एकाच तरुणीवर प्रेम करीत होते. त्या तरुणीच्या नादात महाविद्यालयातही दोघांमध्ये मारामारी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती.
यादरम्यान, मौसम रामटेके नावाच्या मित्राने दोघांचे मन जुळवण्यासाठी प्रयत्न केले. बादशहाने शशांकला सोमवारी दुपारी दोन वाजता डोंगरगाव परिसरात वाद मिटवण्यासाठी चर्चा करण्यास बोलावले. शशांक आणि मौसम हे दोघेही दुचाकीने डोंगरगाव परिसरात पोहोचले. आरोपी बादशहा हा साथीदार विशाल, आकाश, हिमांशू आणि शैलेश यांना घेऊन तेथे पोहचला. मौसमने बादशहाची समजूत घालत वाद मिटवून पुन्हा मैत्री करण्यासाठी बोलणी केली. त्यामुळे बादशहा आणि त्याच्या साथीदारांनी मौसमला मारहाण करणे सुरू केले.
त्यामुळे चिडलेल्या शशांकने बादशहाला कानशिलात लगावली. त्यामुळे त्यांनी मौसमला सोडले आणि चाकू व कटरने शशांकवर हल्ला चढवला. काही मिनिटातच शशांक रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर मौसमने संधी साधून तेथून पळ काढला. काही वेळाने मौसमने पोलिसांना माहिती दिली. हिंगणा पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाहीत. शशांकला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे शशांकचा रात्री १०.३० वाजता मृत्यू झाला.
0 Comments