घरी भोपळ्याची भाजी खाऊन कुटुंब झोपी गेले. रात्री उशिरा उलट्या होत असल्यामुळे नऊ जणांचं कुटुंब डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलं. मात्र यावेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला
चंदिगढ : जेवणातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणातील रोहतक येथील शिवाजी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलंद गावात ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. १५ ऑगस्टच्या रात्री घरीच तयार केलेली भोपळ्याची भाजी खाल्ल्यानंतर कुटुंबाची तब्येत बिघडली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
१५ ऑगस्टच्या रात्री बालंद येथील एकाच कुटुंबातील नऊ जण आजारी पडले. घरी पेठे की सब्जी अर्थात भोपळ्याची भाजी खाऊन कुटुंब झोपी गेले. रात्री उशिरा उलट्या होत असल्यामुळे संपूर्ण कुटुंब डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना औषध देऊन घरी पाठवले. मात्र यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
राजेश यांच्या मुली दिव्या (७ वर्षे) आणि इयांशु (२ वर्षे) आणि राकेश यांची मुलगी लक्षिता (८ वर्षे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गणिका (१० वर्षे) हिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबातील इतर सदस्य राकेश आणि त्याची पत्नी मोनिका, राजेश आणि त्याची पत्नी सीमा, राजेशचा मोठा मुलगा जतीन (१० वर्षे) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजेश आणि राकेश हे दोघे सख्खे भाऊ बालंद गावात आपल्या परिवारासह राहत होते. सध्या कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. डॉक्टरांनी त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे.
0 Comments