Tomato news : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची अज्ञातांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. टोमॅटो विक्रीतून शेतकऱ्याला 30 लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे.
अमरावती, 13 जुलै : सध्या देशभरात टोमॅटोची चर्चा पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर इतके वाढले आहेत की आता विकणाऱ्यासोबत घेणाराही श्रीमंतांच्या श्रेणीत गणला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावरही फक्त टोमॅटोची हवा दिसत आहे. लोक मीम्स व्हायरल करत आहे. दुसरीकडे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. अशात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात एका टोमॅटो शेतकऱ्याची लुटण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आली.
नरेम राजशेखर रेड्डी (62) यांची बुधवारी मदनपल्ले मंडलातील बोडीमल्लादिन गावात हत्या झाली. मंगळवारी रात्री ते गावी दूध देण्यासाठी जात असताना त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी त्यांना रोखून हात पाय बांधून टॉवेलने गळा आवळून खून केला.
काय आहे प्रकरण?
शेतात राहणारे नरेम राजशेखर रेड्डी आपल्या गावापासून दूर दूध पोचवण्यासाठी गावात जात होते. त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, काही अज्ञात लोक टोमॅटो खरेदीच्या बहाण्याने शेतात आले होते. पती गावी गेल्याचे तिने सांगताच ते निघून गेले. या शेतकऱ्याने नुकतेच कृषी बाजारात टोमॅटो विकून 30 लाख रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे. हेच पैसे लुटण्याच्या हेतून ही हत्या झाल्याचा संशय आहे. शेतकऱ्याकडे पैसे होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) केसप्पा यांनी सांगितले की, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी स्निफर डॉग तैनात केले. कुत्रा घटनास्थळावरून मृताच्या घरापर्यंत गेला. 3-4 जणांनी मिळून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस अधीक्षक गंगाधर राव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित असून त्या बंगलोर येथे राहतात.
0 Comments