नाशिक शहरातील महिला सुरक्षा कक्षातच पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक, 28 जुलै : पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी नाशिक पोलीस विभागाने ‘भरोसा सेल’ची निर्मिती केली आहे. आतापर्यंत हजारो दाम्पत्यांची दुरावलेली मने या सेलमध्ये जुळली आहेत. भरोसा सेलमध्ये दोन्ही बाजू ऐकून पती पत्नीचे समुपदेशन करण्यात येते. या मोहिमेमुळे अनेकांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभारले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी शांततेने बसून वाद मिटवले जातात, त्याच ठिकाणी आज हत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. भरोसा सेलमध्ये पती-पत्नीच्या वादाला हिंसक वळण लागल्याचे प्रकरण घडलं आहे.
पती पत्नीतील विकोपाला गेलेला वाद मिटवण्यासाठी नातेवाईक भरोसा सेलमध्ये आले होते. याच महिला सुरक्षा कक्षात हल्ल्याचा प्रयत्न झाला. पत्नीच्या मामाकडून पतीच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. महिला पोलिसांसमोर पत्नीच्या मामाने पतीला चाकू खुपसला. नाशिकच्या शरणपूर पोलीस चौकीतील भरोसा सेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली. दरम्यान, जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लैंगिक अत्याचाराला व कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्या पीडितांच्या सर्वतोपरी मदतीसाठी ‘भरोसा सेल’ची निर्मिती शहर पोलीसांकडून करण्यात आली आहे. महिलांवर होणारे मानसिक, शारीरिक अत्याचार, हुंडाबळी सारख्या घटनांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून भरोसा सेलची स्थापणा करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन काळात पती-पत्नीच्या वादाचे प्रकरण वाढल्याचे पाहायला मिळाले होते. यात मुख्य कारण विवाहबाह्य संबंध ठरत असून यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पती पत्नीचं समुपदेशन करुन त्यांच्यात तडजोड करण्याचे काम नाशिकचं भरोसा सेल करत आहे.
0 Comments