-->

Ads

डोंबिवली, कल्याणमध्ये एकाच दिवसात तीन मंगळसूत्र चोरीच्या घटना

मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.


डोंबिवली: रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढतच चालल्याने महिला वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी दिवसभरात डोंबिवली, कल्याणमध्ये दुचाकीवरुन आलेल्या भुरट्या चोरांनी तीन महिलांच्या गळ्यातील दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज लुटून नेला.

डोंबिवली एमआयडीसीतील सुदर्शन नगरमध्ये राहणाऱ्या अरुंधती कुलकर्णी (७२) बुधवारी सकाळी साडे सात वाजता आपल्या सुने बरोबर सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. सेंट जोसेफ शाळेच्या बाजुने जात असताना दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी काही कळण्याच्या आत अरुंधती यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

या घटनेनंतर कल्याण पश्चिमेतील काळा तलाव भागातील बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूकडील रस्त्याने आग्रा रस्ता उषा दर्शन सोसायटीत राहणाऱ्या विजया लासुरे (५१) बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता पायी चालल्या होत्या. दुचाकीवरुन दोन जण त्यांच्या जवळ अचानक आले. त्यांनी विजया यांच्या मानेवर जोराने फटका मारुन ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. विजया यांनी चोरट्यांना विरोध केला, या झटापटीत चोरट्यांनी त्यांचा गाऊन फाडला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी भागात राहाणाऱ्या रेखा रामधुमाळे (४९) बुधवारी सकाळी साडे दहा वाजता विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळून पायी चालल्या होत्या. यावेळी त्यांच्या जवळ दुचाकीवरुन दोन जण वेगाने आले. त्यांनी काही कळण्याच्या आत रेखा यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. रेखा यांनी चोरट्यांना विरोध केला, पण चोरट्यांनी त्यांना जमिनीवर ढकलून देऊन दुखापत करुन पळून गेले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रेखा यांनी तक्रार केली आहे.

वाहन चोरी आणि मंगळसूत्र लुटीच्या घटनांनी कल्याण, डोंबिवली शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यापूर्वी सकाळ, संध्याकाळ वर्दळीच्या ठिकाणी पोलीस गस्तीवर असायचे आता पोलीस दिलेल्या ठिकाणांवर हजेरीचा शिक्का मारुन निघून जातात. आपण त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे फक्त कागदोपत्री दाखवतात. त्यामुळे शहराच्या गल्लीबोळात गुन्हेगारांचा वावर वाढत असल्याचे जाणकारांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments