-->

Ads

झऱ्यात आंघोळीसाठी गेला, अमिबानं मेंदू खाल्ला; दुर्मीळ संसर्गानं मुलाचा करुण अंत

मेंदू खाणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आंघोळीसाठी झऱ्यावर गेला असताना नाकावाटे अमिबा त्याच्या मेंदूपर्यंत गेला. सहा दिवस त्याचा मृत्यूशी संघर्ष सुर होता


थिरुअनंतपुरम: मेंदूला दुर्मीळ संसर्ग झाल्यानं केरळच्या अलप्पुझामध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यात आढळून येणारा अमिबा मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. अमिबा नाकाच्या वाटे अमिबा डोक्यापर्यंत पोहोचला. गुरुदत्त असं मृत मुलाचं नाव आहे. रविवारपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यानं अखेरचा श्वास घेतला. मेंदू खाणाऱ्या अमिबानं गुरुदत्तचा जीव घेतला. त्याच्या मृ्त्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शालिनी आणि अनिल कुमार यांचा मुलगा असलेला गुरुदत्त झऱ्यावर अंघोळ करायला गेला होता. त्यावेळी त्याला मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग झाला. त्याला सतत ताप येत होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस इंफेक्शन झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. रविवारपासून गुरुदत्तचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. मृत्यूशी सुरू असलेली झुंज शुक्रवारी संपली. अलप्पुझा वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

लहान मुलांना दूषित पाण्यापासून दूर ठेवा, असं आवाहन केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी केलं. 'अमिबा साचलेल्या पाण्यात असतो. नाकाच्या पातळ त्वचेतून तो आत शिरतो. हा काही संसर्गजन्य आजार नाही. अशा घटना अतिशय दुर्मीळ असतात. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही,' असं जॉर्ज म्हणाल्या.

मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पहिला रुग्ण २०१६ मध्ये सापडला. त्यानंतर २०१९, २०२०, २०२२ मध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली होती. या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला. ताप, डोकेदुखी, उलट्या होणं ही अमिबा संसर्गाची लक्षणं आहेत. संसर्ग झाल्यानंतर २४ तास ते १४ दिवसांत ही लक्षणं दिसून येतात.माती, गरम ताजं पाणी, सरोवर, नद्या आणि गरम झऱ्यांमध्ये अमिबा आढळून येतो.


Post a Comment

0 Comments