आरोपी अविनाश मामलेकर याने झूमकार या ॲपच्या माध्यमातून कार मालकांशी संपर्क केला व त्यांचा विश्वास संपादन करुन अगोदर चार दिवसांसाठी व नंतर तीन दिवसांसाठी कार भाड्याने घेतली. ॲपच्या नियमानुसार आरोपी अविनाश मामलेकर याने त्याचे आधारकार्ड व वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत कार मालकांकडे जमा केली होती.
मुदत संपल्यानंतर कार मालकाने कार परत करण्याची विनंती केली मात्र आरोपीने फोनला उत्तर देण्यास टाळाटाळ सुरू केली. अनेक वेळा प्रयत्न करुनही आरोपी कार परत न देता वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असल्याचे कारमध्ये बसविलेल्या जीपीएस यंत्रणेवरुन कार मालकांना दिसत होते.
अखेर आरोपी अविनाश मामलेकर याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कार मालकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार केली.
प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे व पोलीस हवालदार विलास प्रधान यांनी तांत्रिक माहिती पडताळल्यानंतर कार गुजरात राज्यातील वापी परिसरात असल्याचे आढळून आले.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे व पोलीस हवालदार विलास प्रधान यांनी गुजरात येथे जाऊन आरोपीने बेवारस स्थितीत सोडून दिलेली कार परत आणली आहे.
फरार आरोपी अविनाश मामलेकर याचा शोध सुरू असून कायद्यातील तरतुदीनुसार ही कार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर मूळ मालकांना परत देण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments