-->

Ads

गर्लफ्रेंडचा हात मागण्यासाठी तो घरी गेला अन् तिच्या घरच्यांनी दिली भयंकर वेदना

दोघांचा धर्म वेगळा होता. तरीही धाडस करून प्रेमापोटी तो लग्नाची मागणी घेऊन तिच्या घरी दाखल झाला. त्यानंतर जे काही घडलं, त्याने केवळ परिसरातील लोकच नाही, तर पोलीसही हादरले.


बुलंदशहर, 26 जुलै : ज्योती मौर्य-आलोक मौर्य, सीमा-सचिन, मंजू अशा प्रेमप्रकरणाच्या विविध घटना सध्या एकामागून एक गाजताहेत. आता यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात राहणारा एक तरुण नोएडातील एका कंपनीत नोकरीला होता. शेजारच्या तरुणीवर त्याचा जीव जडला. तरुणीलाही तो आवडू लागला. दोघांनी एकमेकांची साथ आयुष्यभर न सोडण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र दोघांचा धर्म वेगळा होता. तरीही धाडस करून प्रेमापोटी तो लग्नाची मागणी घेऊन तिच्या घरी दाखल झाला. त्यानंतर जे काही घडलं, त्याने केवळ परिसरातील लोकच नाही, तर पोलीसही हादरले.

पीडित तरुणाने आरोप केला आहे की, प्रेयसीच्या घरी तिच्या नातेवाईकांनी त्याला दोन दिवस कोंडून ठेवलं. धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणला. एवढंच नाही, तर जबरदस्तीने त्याचा सुंताही केला. तरुणाने याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे रीतसर लेखी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहरच्या गुलावठी पोलीस ठाणा क्षेत्रात राहणारा एक तरुण नोएडाच्या फेस-2मधील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तिथे जवळच तो भाड्याने खोली घेऊन राहायचा. त्याठिकाणी शेजारी राहणाऱ्या एक परधर्मीय तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि त्यांची मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचं प्रेम एवढं खोलवर गेलं की, आता एकत्र जगायचं आणि एकत्रच मरायचं असं त्यांनी ठरवलं. आता लग्नाचा निर्णयही झाला. मग तरुणीने त्याला घरी येऊन रीतसर मागणी घालण्यास सांगितलं.

प्रेयसीच्या इच्छेनुसार तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला हा तरुण 21 जुलैला तिच्या घरी दाखल झाला. त्याने तिच्या घरच्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी तरुणीचे आई-वडील आणि 2 भावांनी त्याला घरातल्याच एका खोलीत नेलं आणि डांबून ठेवलं. आधी धर्मपरिवर्तन कर, मगच आमच्या मुलीशी निकाह करता येईल, अशी अट त्यांनी घातली. यासाठी तरुणाने नकार देताच तरुणीच्या कुटुंबीयांनी एका डॉक्टरांना घरी बोलवून त्याला इंजेक्शन दिलं. तरुण बेशुद्ध झाल्यावर त्याला एका खासगी रुग्णालयात नेऊन जबरदस्तीने त्याचा सुंता करण्यात आला.

हे सगळं घडताना प्रेयसी काय करत होती?

तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच्यासह तिलादेखील डांबून ठेवलं होतं. मात्र कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून तिने गुपचूप तरुणाच्या कुटुंबीयांना फोन लावून याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाची सुटका करून त्याला घरी घेऊन गेले. घडलेल्या सर्व प्रकाराबाबत पीडित तरुणाने कुटुंबीय आणि प्रेयसीसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, याप्रकरणी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

'सुंता' म्हणजे काय?

पुरुषाच्या शिश्नमण्याभोवती असलेली चिकटलेली त्वचा काढून टाकण्याच्या क्रियेला सुंता म्हणतात. ही जगातील एक प्राचीन शस्त्रक्रिया आहे. कित्येक धर्मांनी ही प्रथा स्वीकारली असून त्यामागे प्रत्येक धर्माचा काहीतरी वेगळा उद्देश असतो. जसं की, त्यांची सांस्कृतिक ओळख टिकवणं किंवा देवाला संतुष्ट करणं, इत्यादी.


Post a Comment

0 Comments