-->

Ads

वरंधा घाटात भीषण अपघात, बंदी असताना प्रवास करणं जीवावर बेतलं, कार धरणात कोसळली, तिघे बुडाले

पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक चारचाकी नीरा देवधर धरणात कोसळली. या घाटातून प्रवास करण्यास प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही प्रवास करणं तिघांच्या जीवावर बेतलं आहे.


पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. घाट माथ्यावर तर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र घाट बंद असताना काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. वरांधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक चारचाकी नीरा देवधर धरणात कोसळली आहे. या कारमधून चौघेजण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक मोटार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. आज शनिवारी तारीख २९ जुलै रोजी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते. त्यापैकी एक जण बचावला आहे. तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघातग्रस्त हे पुण्यातील रावेत येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने बंदी घातली असतानाही ही कार गेली कशी? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. नेमकी घटना कशाने घडली हे आता लवकरच समोर येणार आहे.

पुण्याहून भोरमार्गे रायगड जिल्ह्यातल्या महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंधा घाट २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत रामदास स्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.



Post a Comment

0 Comments