Dombivli School Unique Way Of Teaching: भरपावसाळ्यात साधारण गुडघाभर चिखलात उतरून टिळकनगर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केलेला उपक्रम सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे
Dombivli School Unique Way Of Teaching: डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच एका खास क्षेत्रभेटीत भात शेतीचा अनुभव घेतला. मुख्यध्यापिका अर्चना पावडे यांनी सांगितल्याप्रमाणे, लोकमान्य गुरुकुल ही पंचकोषाधारीत शाळा आहे. अन्नमय, प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय असे हे पाच कोशांनी प्रत्येकाचे शरीर तयार झालेले आहे.या प्रत्येक कोशाच्या विकासासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने प्रयत्न करावे लागतात. याचा विचार लोकमान्य गुरुकुलमध्ये केला जातो. याचाच एक भाग म्हणजे क्षेत्रभेट.
फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही तर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे क्षेत्रभेटीतून कळते. यासाठी विविध ठिकाणी क्षेत्रभेटी आयोजित केल्या जातात. शेतकरी पीक घेतो ,कष्ट करतो, म्हणजे तो नक्की काय करतो? या सगळ्याचा अनुभव येण्यासाठी लोकमान्य गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांनी दावडी येथे भात शेती लागवड केली.
साधारण गुडघाभर चिखलात उतरून सर्व विद्यार्थ्यांनी भाताची रोपे कशी काढतात? त्या रोपांची मुळे कशी धुवतात व परत त्याची लागवड कशी करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव शेतातल्या चिखलामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी घेतला. भाताचे पीक कोणत्या ऋतूत काढतात? त्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे? पोषक वातावरण काय आहे? या सगळ्याची माहिती सुलोचना गोरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. शेतकरी कष्ट करून शेती करतो .त्यामुळे आपण आपल्या ताटातलं अन्न वाया जाऊ देऊ नये किंवा टाकू नये याचेही महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यादरम्यान विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे चिखलात माखण्याचा आनंद लुटला. बाजूलाच असलेल्या छोट्या पाण्याच्या डबक्यात भिजण्याचाही आनंद लुटला. यावेळी मंगेश गायकर, सुलोचना गोरे-चौधरी, सारिका लोखंडे, लोकमान्य गुरुकुलाचे लिपिक श्रीकांत श्रीखंडे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई, मुख्याध्यापिका अर्चना पावडे असा शिक्षकवृंद सुद्धा विद्यार्थ्यांसह उपक्रमात सहभागी झाला होता.
0 Comments