-->

Ads

नाल्यात वाहून गेलेल्या बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही ट्रेनमधून उतरलो कारण… “

Mumbai Rains News: बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेनमधून खाली उतरलातच का? यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.


Six Month Baby Fell In Drainage:  मुंबईला मागील तीन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अशातच बुधवारी, संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकेल अशी एक घटना कल्याणच्या पत्रीपूल परिसरात घडली. हैदराबादच्या राहणाऱ्या योगिता रुमाले भिवंडीला आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या होत्या. सहा महिन्यांच्या बाळाला मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचारासाठी न्यायला त्या मुसळधार पाऊस असुनही बुधवारी स्वतः व वडिल ज्ञानेश्वर पोगूल यांच्यासह घरून निघाल्या होत्या. परतीच्या वेळी अंबरनाथ लोकल पत्रीपुलाजवळ बराच वेळ उभी होती. लोकल कल्याण रेल्वे स्थानकात जाण्याची चिन्हे नव्हती. इतर प्रवाशांप्रमाणे रेल्वे रुळावरून कल्याण स्थानकाकडे पायी निघालेल्या लोकांबरोबर योगिता व तिचे वडील सुद्धा खाली उतरून चालू लागले. यावेळी आजोबांच्या हातातून बाळ निसटून शेजारच्या नाल्यात पडून वाहून गेले.

यावेळी योगिता यांनी हंबरडा फोडताच लोकही तिथे जमा झाले, अनेकांनी या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र नाल्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोन दिवस शोधकार्य राबवूनही बाळ सापडलेच नाही. याच बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेनमधून खाली उतरलातच का? यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.

वाहून गेलेल्या बाळाच्या आजोबांची प्रतिक्रिया


बाळाचे आजोबा सांगतात की, “कोपरला उतरायचं होतं, पण कल्याण स्टेशन जवळ असल्याने आम्ही थांबलो. आम्ही १२ वाजता निघालो होतो पण दोन- तीन तास ट्रेन डोंबिवली कल्याणच्या खाडीच्या इथेच थांबली होती. ट्रेनमधून उतरल्यावर आधी तिथे पाय घसरून माझी मुलगी (योगिता) पडली होती, मग तिला उचलून पुन्हा आम्ही नीट चालायला लागलो. आधी बाळ मुलीच्या हातात होतं पण ती घसरल्याने मी माझ्या हातात घेतलं. मी पण प्लॅस्टिकचा रेनकोट घातला होता त्यामुळे बाळ त्या रेनकोटवरून घसरलं. शिवाय ती वाट घसरट असल्याने नंतर मी पण पडणार होतो, पण तोल सावरण्याच्या नादात माझ्या हातून नात निसटली व पडली.”

“आम्ही मागच्या सहा महिन्यांपासून वाडिया हॉस्पिटलला बाळाला घेऊन जात होतो. त्यादिवशी सुद्धा तपासणीचीच तारीख होती म्हणून घरातून निघालो. परत येताना कल्याण डोंबिवली दरम्यान ट्रेन बराच वेळ थांबल्याने सगळेच खाली उतरत होते पूर्ण लोकल रिकामी झाली होती म्हणून आम्ही हिंमत करून उतरलो. आता यासगळ्यासाठी आम्हाला मुंबईला जावं लागलं कारण भिवंडीमध्ये तशी आरोग्य सेवा- सुविधा नाही. जर भिवंडीतच असे मोठे हॉस्पिटल्स असते तर ही घटना टळली असती

दरम्यान, बुधवार (२० जुलै) व गुरुवार (२१ जुलै) या दोन दिवसात या बाळाचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवान, कल्याण डोंबिवली पालिका आधारवाडी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी प्रयत्न केले पण अखेरीस बाळ न सापडल्याने त्यांना शोधकार्य थांबवावे लागले.




Post a Comment

0 Comments