-->

Ads

VIDEO: पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune Crime News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत. 


Pune Crime News Today: पुणे शहरात (Pune Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळच्या सुमारास पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस स्टेशनच्याजवळ एका एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शंतनू जाधव (22) असं हल्लेखोर आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रेम प्रकरणावरून या आरोपीने तरुणीवर कोयत्याने वार केल्याचे समजतेय. सुदैवाने वेळीच दोन तरुण मदतीसाठी धावल्याने सदर तरुणीचा जीव वाचला आहे. त्यांनी जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


आज सकाळ्या सुमारास टिळक रोड येथे ही घटना घडली आहे. सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास सदाशिव पेठेत एमपीएससीची तयारी करणारे तरुण हे अभ्यासिकेत जात होते. त्याचवेळी रस्त्यावर एक तरुणी पळत असताना तिच्या मागे एक तरुण कोयता हातात घेऊन मागे धावत असल्याचं दिसलं. रस्त्यावर मोठी गर्दी झालेली असताना कोणीमध्ये पडलं नाही. पण या तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीचा जीव वाचवला आणि त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

शंतनूचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे. तरुणीने नकार दिल्यानंतरही तो सतत तिचा पाठलाग करायचा. तसंच, सतत जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.  मी कॉलेजला जाण्यासाठी निघाले असताना तो बोलायला म्हणून माझ्याजवळ आला मी बोलण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला मारहाण केली. माझ्यावर कोयत्याने वार केले, अशी तक्रार तरुणीने केली आहे. 

नेमकं काय घडलं?


एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्याच मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाचा तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतला आहे. 





Post a Comment

0 Comments