Palghar News : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंगवत असताना एक अतिउत्साही तरुण समुद्रात उतरल्याने त्याच्या चांगलच अंगलट आलं आहे.
खवळलेल्या समुद्रात पोहणे अंगलट
बोईसर मधील टाटा हाऊसिंग येथे राहणारा फैजल आबादी सैफी हा 27 वर्षीय तरुण आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिंचणी येथील समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मात्र, समुद्रातील पाण्याच्या लाटांचा वेग वाढल्याने हा तरुण अचानक पाण्यात बुडू लागला. ही बाब तिथे असलेल्या एका स्थानिकाच्या लक्षात आल्याने या स्थानिकाने लागलीच चिंचणी पोलीस दुरक्षत्र येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भूषण संखे यांना फोनद्वारे संपर्क केला. यानंतर पोलिसांनी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दोन तरुणांच्या मदतीने बुडत असलेल्या तरुणाला खवळलेल्या समुद्राची भीती न बाळगता बाहेर काढलं. यावेळी बुडत असलेल्या तरुणाच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याला चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर हवेचा वेग तसेच समुद्रातील पाण्याच्या लाटांचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत याच पद्धतीने आपला जीव धोक्यात टाकत असल्याचं अनेकवेळा समोर आल आहे.
त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
0 Comments