-->

Ads

मासे पकडण्याच्या जाळ्यात पाय अडकला, NDA तील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; देशसेवेचं स्वप्न अधुरं

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


धुळे : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा हाडाखेड तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. डॅममध्ये पोहत असताना मासे पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यात अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.

यावेळी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील दादुसिंग कॉलनी परिसरात राहणाऱ्या हिमांशू शरद चौधरी मुळगाव जापोरा ता. शिरपूर हा आपल्या मित्रांसोबत शिरपूर तालुक्यातील हाडाखेड पासून दोन ते तिन किमी अंतरावर असलेल्या डॅममध्ये सायंकाळी पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पोहत असतांना हिमांशू चौधरी हा पाण्यात मासे पकडण्यासाठी पसरवलेल्या जाळ्यात अडकल्याने पाण्यात बुडाला.

हिमांशू बुडाल्याचे समजताच मित्रांनी आरडाओरड केली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुर्णपणे पाण्यात बुडाला होता. त्याच्या मित्रांनी घटनेबाबत हिमांशूच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्याचा तात्काळ पाण्यात शोध सुरु केला असताना रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह मिळून आला.

विशेष बाब म्हणजे, हिमांशू चौधरी याची काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये निवड झाली होती. तो सुट्यांमध्ये शिरपूर येथे आला होता. दहिवद येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर राजपूत यांच्यासह सहकाऱ्यांनी हिमांशूचा मृतदेह रात्री शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. आज हिमांशूवर शिरपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments