-->

Ads

Mumbai Traffic : कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीत खासगी बसेसच्या पार्कींगची भर

 डोंबिवली - पावसास सुरुवात झाली असून कल्याण शीळ रोडवरील वाहतूक कोंडीत आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. असे असतानाच या रस्त्यावर खासगी बसेस पार्कींगची भर पडली आहे. कल्याण शीळ रोडवर मोठ्या प्रमाणात खासगी बसेसचे पार्कींग करण्यात येत आहे.

या बसेस बाहेरच्या परिसरातील असून कोणाच्या आर्शिवादाने या बसेस येथे उभ्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच बसला कार धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना या परिसरात घडली होती.


त्यानंतरही या ठिकाणी या बसेस उभ्या रहात असल्याने वाहतूक विभाग नेमके काय करत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.


कल्याण शीळ रोडचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम पूर्ण झालेले नाही. सकाळ संध्याकाळ या रस्त्यावर वाहनांची कोंडी होते, त्यातच पावसास देखील सुरुवात झाल्याने वाहनांचा वेग मंदावून वाहन कोंडीची समस्या आता आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.


अवजड वाहनांना या मार्गावरुन प्रवेश बंदी असतानाही या मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. रस्त्याचे अर्धवट कामे,


वाहनांची वाढती संख्या वाहन कोंडीस कारणीभूत ठरत आहे. या मार्गावरील नेवाळी चौक, पलावा चौक, विको नाका, काटई चौक या ठिकाणी कायम वाहनांची कोंडी होते.


या कोंडीत भर पडत आहे ती रस्त्याच्या कडेला पार्क केल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची. कल्याण शीळ रोडवर खासगी बसेसची मोठ्या प्रमाणात पार्कींग होत आहे.

एका रांगेत या बसेस या मार्गावर उभ्या केल्या जात असून थोड्या थिडक्या नाही तर दहा ते पंधरा बसेस उभ्या केल्या जातात. टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सची वाहने देखील या परिसरात बिनधास्त पार्क केली जातात.


काही दिवसांपूर्वीच कल्याण शीळ मार्गावर दावडी गावाजवळ एक कार पार्क केलेल्या बसला धडकून झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.


भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत याची काहीच शाश्वती नसल्याने वाहतूक पोलिसांनी या बसेस या मार्गावरुन हटवाव्यात अशी मागणी होत होती. मात्र त्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच न्यू कल्याण रोडवरही वाहनांचे अवैध पार्कींग होत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीतील टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स च्या अनेक बसेस मोठ्या प्रमाणात पार्कींग केल्याचे दिसून येते.


तसेच डोंबिवली एमआयडीसी परिसरात भंगार अवस्थेत असलेल्या बसेस, मोठ्या गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या जात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.


नो पार्कींग झोन कागदावरच

कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील कल्याण शीळ रोडचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे. रस्त्याचे सुरु असलेले काम आणि रस्त्याच्या कडेला उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पत्रीपूल ते डोंबिवलीतील लोढा पलावा दरम्यान सध्याची वाहतुकीची परिस्थिती व वाहन पार्किंग करीता उपलब्ध असलेली जागा इत्यादीचे सर्वेक्षण केले होते.


त्यानुसार वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात प्रायोगिक तत्वावर रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग, सम - विषम पार्किंग याप्रमाणे वाहन पार्किंग जागेचे वर्गीकरण करण्यात आले होते.

तसेच या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी कल्याण पूर्व पत्रीपूल ते डोंबिवली पूर्व लोढा पलावा दरम्यान कल्याण शिळ रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूस 9 कि.मी. 24 तास नो-पार्किंग करण्यात आले होते.


तसेच मोती मिठाई चौक ते कावेरी चौक रस्त्याचे दोन्ही बाजूस 1 कि.मी. 24 तास नो-पार्किंग करण्यात आले असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती.

ही अधिसूचना 15 दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर राबवून त्यासंदर्भात हरकत अगर सूचना लेखी स्वरुपात पोलिस उप आयुक्त शहर वाहतूक शाखा कार्यालयाकडे मागविण्यात आल्या होत्या.

कोणाची हरकत प्राप्त न झाल्यास सदर अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात आमलात राहील असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले होते. ही वाहतूक नियमन अधिसूचना कागदावरच राहीली असून या ठिकाणी सर्रास खासगी वाहने पार्कींग होताना दिसत आहे.




Post a Comment

0 Comments