-->

Ads

Mumbai News: मुसळधार पावसाने झोपडीवर वडाचे झाड कोसळले, लेकाचा मृत्यू तर संसार उघड्यावर

Mumbai News: भायखळा पूर्वेला एका झोपडीवर झाड कोसळून झालेल्या घटनेत बुधवारी मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रेहमान खान असे मृत तरुणाचे नाव आहे.


मुंबई : भायखळा पूर्वेला एका झोपडीवर झाड कोसळून झालेल्या घटनेत बुधवारी मध्यरात्री एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रेहमान खान असे मृत तरुणाचे नाव आहे. एक जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. बुधवारीही अशाच घटनांमध्ये मालाड आणि गोरेगावमध्ये मिळून दोघांचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व झाडांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.


भायखळा पूर्वेला भायखळा पोलिस स्टेशनजवळच इंदू ऑईल मिल कंपाऊंडमध्ये काही झोपड्या आहेत. बुधवारी मध्यरात्री वडाचे झाड एका झोपडीवर कोसळले. त्यावेळी या झाडाच्या फांद्यांत २२ वर्षीय रेहमान खान आणि २० वर्षीय रिझवान खान अडकले. याची माहिती अग्निशमन दल, पोलिस आणि मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. रेहमान आणि रिझवानला बाहेर काढताच त्यांना जे.जे रुग्णालयात नेण्यात आले.

उपचारादरम्यान रेहमानचा मृत्यू झाला. तर रिझवानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली. बुधवारी झाड कोसळून झालेल्या घटनेत मालाड पश्चिमेला ३८ वर्षीय कौशल दोशी आणि गोरेगाव पश्चिमेला पालिका वसाहत येथे ३० वर्षीय प्रेमलाल निर्माल या दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईत गेल्या दोन दिवसांत एकूण तीन जणांचा मृत्यू हा झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आहे.

मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, या घटनांची जबाबदारी मुंबई महापालिकेने घ्यावी, अशी मागणी केली आहे. पालिकेने पावसाळ्याआधी २४ वॉर्डमध्ये तज्ज्ञांमार्फत झाडांची तपासणी करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments