-->

Ads

Jalgaon News : तपासासाठी जात असलेल्या पोलीस पथकावर काळाचा घाला; दोघांचा जाग्यावर मृत्यू तर 3 गंभीर

Jalgaon News : तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याने मोठा अपघात घडला. यात सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला.


जळगाव, 29 जून : गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या पोलिसांच्या गाडीवर काळाने घाला घातला. जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ झाड कोसळलं. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?


पोलीस विभागाची गाडी 5 जणांच्या पथकासह एका गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्यासाठी कासोदाकडे जात होते. यावेळी पावणे दहाच्या सुमारास अचानक त्यांच्या गाडीवर मोठं झाड कोसळलं. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चालकाचा मृत्यू झाला. तर गाडीमधील इतर 3 कर्मचारीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.


स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत हा अपघात घडला आहे. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी पोहचले. आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातात बापलेकाचा मृत्यू


जळगाव शहरातील श्रीराम नगरातील बालाजी लॉन्ससमोर रात्री साडेनऊवाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार प्रमोद वना झोपे (वय 58) हे जागीच ठार तर त्यांचा मुलगा धीरज झोपे (वय 32) हा जखमी झाला. जखमीस रिदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.



Post a Comment

0 Comments