-->

Ads

दोन दिवसांपूर्वी लग्न, माहेरी येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या, मेहंदीच्या हातांनी आयुष्य संपवलं

Jalgaon Married Girl Suicide: घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी पाहिले असता नवविवाहितेच्या माहेरच्या मंडळींना ती आणि तिचा प्रियकर हे दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.


जळगाव : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र राजु राठोड (वय - १९) व साक्षी सोमनाथ भोई - (वय -१८) दोन्ही रा. वरखेडी नाका परिसर, पाचोरा असे मयत प्रेमीयुगालाचे नाव आहे.  

कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला विरोध होता, यातच साक्षीचा विवाह झाला होता, मात्र तिला तो विवाह मान्य नव्हता, म्हणून ती माहेरी आली. त्यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पाचोरा शहरातील वरखेडी नाका परिसरात जितेंद्र राठोड हा त्याच्या कुटुंबासह वास्तव्यास होता. तर याच परिसरात म्हणजे जितेंद्रच्या घरापासून दोन घरे सोडून काही अंतरावर साक्षी भोई ही सुद्धा तिच्या कुटुंबासह राहत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकमेकांना फोनवरुन संपर्क केला. त्यानंतर रात्रीच घराच्या मागे असलेल्या मोंढाळा रोडवरील पडक्या अंगणवाडी शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरवले. या ठिकाणी जितेंद्र व साक्षी या दोघांनी एकाच दोरीने गळफास लावून जीवन संपवले.


दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास साक्षी हिच्या भावाला जाग आली. तेव्हा त्याने बहीण साक्षी हिचा शोध घेण्यात सुरुवात केली, मात्र ती सापडली नाही. घराच्या मागील बाजूस अंगणवाडीच्या ठिकाणी काहीतरी असावे म्हणून त्या ठिकाणी पाहण्यास गेले तर त्या ठिकाणी साक्षी व जितेंद्र हे दोघेही जण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले


घटनेची माहिती समोर आल्यानंतर जितेंद्र व साक्षी या दोघांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. पोलिस कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे यांनी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील याला सोबत घेत घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मदतीने दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान मयत साक्षी भोई हिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पती असा परिवार आहे तर मयत जितेंद्र राठोड यांच्या पश्चात आई-वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. जितेंद्र राठोड याचा परिवार मोलमजुरी करतो. तर साक्षी भोई हिचा परिवार मासे विक्री करून उदरनिर्वाह करतो.


जितेंद्र हा बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झाला आहे. साक्षी भोई हिचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जून रोजी विवाह झाला आहे. विवाहानंतर ती रविवारी माहेरी आली होती. याचदरम्यान तिने जितेंद्रशी संपर्क साधला. लग्न करुन आपण दोघेही सोबत राहू शकत नाही या विवंचनेत दोघांनी जीवन संपविले.


एक दुजे के लिये या हिंदी चित्रपटातील कथानकाचा या घटनेच्या निमित्ताने प्रत्यय आला असल्याची परिसरात चर्चा आहे. या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments