-->

Ads

कल्याणमध्ये लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानी, प्रवाशांना रिक्षेतून उतरवण्याचे प्रकार

लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षेत प्रवासी म्हणून घेण्यापेक्षा हे रिक्षा चालक आधारवाडी श्री कॉम्पलेक्सकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाड्याच्या आमिषाने घेण्यास प्राधान्य देतात.

कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील लालचौकी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक मनमानी करत आहेत. लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षेत प्रवासी म्हणून घेण्यापेक्षा हे रिक्षा चालक आधारवाडी श्री कॉम्पलेक्सकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाड्याच्या आमिषाने घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे लालचौकीला जाणारा प्रवासी रिक्षा वाहनतळावर ताटकळत राहतो, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

करोना महासाथीच्या काळात रिक्षा चालकांना प्रवाशांच्या सोयीप्रमाणे नेण्याची मुभा परिवहन विभागाने दिली होती. त्याच आदेशाचा गैरफायदा घेत लालचौकी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक मनमानी करत आहेत. आता ही मनमानी खूप वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. लालचौकी परिसरात शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये अधिक आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर मुंबई, कसारा, आसनगाव, कर्जतकडून येणारा प्रवासी लालचौकी रिक्षा वाहनतळावर येऊन 
इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतो.


लालचौकी प्रवासासाठी सामायिक भागीदारीतून प्रती प्रवासी भाडे १५ रुपये आहे. असे तीन प्रवासी घेऊन रिक्षा चालक लालचौकीला फेरी मारतो. एका फेरीत चालकाला ४५ रुपये भाडे मिळते. गेल्या दोन वर्षापासून लालचौकी वाहनतळावरील रिक्षा चालक लालचौकी भाड्यापेक्षा आधारवाडी जवळील श्री कॉम्पलेक्स येथील भाडे घेण्याला प्राधान्य देत आहे. या भाड्यापोटी प्रती प्रवासी रिक्षा चालकाला ६० ते ७० रुपये मिळतात. त्यामुळे लालचौकीच्या १५ रुपये सामायिक भाड्यापेक्षा रिक्षा चालक श्री कॉम्पलेक्स येथील भाडे घेण्याला प्राधान्य देत आहे, असे प्रवाशांनी सांगितले.


लालचौकीला जाणारा प्रवासी रिक्षेत बसला असेल त्याचवेळी आधारवाडी श्री कॉम्पलेक्स येथे जाणारे दोन प्रवासी आले तर चालक लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षेतून खाली उतरवितो. लालचौकी वाहनतळावरील बहुतांशी रिक्षा चालक श्री कॉम्पलेक्स येथील भाड्याला प्राधान्य देत असल्याने लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला बराच उशीर रिक्षेसाठी ताटकळत राहावे लागते, असे प्रवाशांनी सांगितले. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नियमित कार्यालयात, शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर होतो. नियमित रिक्षेची उशिराची कारणे देऊन कार्यालयात चालत नाहीत, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.


मला रिक्षेतून का उतरविले. लालचौकी भाडे तुम्ही का नाकरता, असे प्रश्न लालचौकीच्या प्रवाशाने रिक्षा चालकाला केले तर जा तुम्ही माझी कुठेही तक्रार करा. आम्हाला कोणी काही करणार नाही. आमचे सगळीकडे हप्ते आहेत, अशी धमकी रिक्षा चालक प्रवाशांना देतात. लालचौकी रिक्षा वाहनतळावरील या रिक्षा चालकांचा बंदोबस्त करण्यास रिक्षा संघटना पदाधिकारी अपयशी ठरल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


“लालचौकी रिक्षा वाहनतळावर प्रवासी मनमानी करत असतील तर त्याठिकाणी भरारी पथकाचे अधिकारी तैनात करतो. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश देतो. रिक्षा चालकाने भाडे नाकारले तर प्रवाशांनी थेट आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा.”

“लालचौकी वाहनतळावर सुरू असलेल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाई सुरू करावी अशी मागणी आरटीओ, वाहतूक विभागाकडे केली आहे.” -संतोष नवले, कार्याध्यक्ष, रिक्षा चालक मालक संघटना.

“लालचौकी रिक्षा वाहनतळावर लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला घेण्यापेक्षा रिक्षा चालक आधारवाडी श्री कॉम्पलेक्स येथील प्रवाशाला वाढीव भाड्यासाठी घेण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे लालचौकीला जाणाऱ्या प्रवाशाला वाहनतळावर ताटकळत राहावे लागते. अनेक महिने हा प्रकार सुरू आहे.” -चैत्राली महाडिक, प्रवासी.


Post a Comment

0 Comments