Dombivli News: दोन मित्रांमधील किरकोळ कारणावरून झालेला वाद टोकाला गेला. या वादात एका मित्राने दुसऱ्या मित्राला चाकूने भोसकले. यावेळी जीव वाचवण्यासाठी तरुण पळून जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
डोंबिवली : किरकोळ कारणावरून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पावर परिसरात उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री दोघा मित्रांमधील भांडण टोकाला गेल्याने एकाने दुसऱ्या मित्रावर चाकूने वार केले. चाकूचे वार करणाऱ्या आरोपी किरण शिंदे याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शैलेश शीलवंत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी किरण याने चाकूने भोसकल्या नंतर शैलेश आपला जीव वाचवण्यासाठी काही अंतरापर्यंत पळत गेला. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही अंतरावरच शैलेश जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी आणि मयत पळतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपाडा पोलीस हद्दीतील न्यू कल्याण रोडला लागून असलेल्या टाटा पावर परिसरात शैलेश शीलवंत हा तरुण राहत होता. शैलेश रिक्षा चालकाचे काम करत होता . आरोपी किरण शिंदे यांच्याशी त्याची ओळख होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून किरण शैलेशवर संतापला आणि याच वादातून किरणने शैलेशला टाटा पावर परिसरात एका इमारती शेजारी गाठले. तिथे शैलेशवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळ काढला, त्याच्या पाठोपाठ आरोपी किरण ही पळू लागला. मात्र, काही अंतर गाठल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने शैलेश जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यूमूखी पडला.
ही माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील तारमाळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी शिंदे याची ओळख पटवून त्याला परिसरातून अटक केली आहे. मित्राला मारण्याचे नक्की कारण काय आहे? किरणवर अजून काही गुन्हे दाखल आहेत का? हे पोलिस आता तपासत असून त्यांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपी किरणला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
0 Comments