-->

Ads

अंबरनाथचा हर्षद झाला लेफ्टनंट, पाहा पहिल्याच प्रयत्नात कसं पूर्ण केलं स्वप्न

हर्षदनं कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात युपीएससी सीडीएस' (कंबाईन डिफेन्स सर्व्हिस) या परीक्षेत यश मिळवलं आहे.


 ठाणे, 26 जून :   देशाचं संरक्षण करणाऱ्या सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न अनेक तरुणांचं असतं. त्यापैकी मोजक्याच तरुणांचं ते स्वप्न पूर्ण होतं. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये राहणारा हर्षद परदेशी या तरुणाचं हे स्वप्न पूर्ण झालंय. विशेष म्हणजे हर्षदनं कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात  युपीएससी सीडीएस' (कंबाईन डिफेन्स सर्व्हिस) या परीक्षेत देशातून 121 वा क्रमांक पटकाविला आहे.

अंबरनाथच्या वडवली सेक्शन परिसरात हर्षद राहतो.  त्यानं दहावीपर्यंतचं शिक्षण बदलापूरच्या कारमेल कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून त्याने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.  हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं लगेच  युपीएससी सीडीएस' या परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीमध्येही तो उत्तम गुण मिळवून पास झाला होता.

कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययन करून या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेत त्याने भारतातून १२१ वा क्रमांक मिळवला आहे. येत्या ७ जुलै रोजी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीतर्फे १८ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली असून त्यानंतर भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून तो रुजू होणार आहे.


'ती' संधी हुकली होती...

सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करणे हे हर्षदचे स्वप्न होते. पण, त्याला नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये प्रवेश मिळाला नाही. ही संधी हुकल्यानंतर निराश न होता त्यानं अभ्यास सुरूच ठेवला.  मेहनत, एकाग्रचित्ताने केलेला अभ्यास आणि गुणवत्तेमुळे यूपीएससी-सीडीएस परीक्षा तो पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे


हर्षदचे वडील मुंबईतील खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. 'यूट्यूब चॅनल, पुस्तकं आणि पेपर असा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपण अभ्यास केला. अंबरनाथ पालिकेच्या वडवली भागातील अभ्यासिकेतही मी जात असे, असं हर्षदनं सांगितलं.  मी या कालावधीत इन्स्टाग्राम पूर्ण बंद केलं होतं. व्हॉट्सअप आणि यूट्यूबचा वापर केवळ अभ्यासाचे व्हिडीओ पाहण्यासाठी करत असे, असं हर्षदनं सांगितलं.



'सैन्यात भरती होण्याचं हर्षदचं पहिल्यापासूनच स्वप्न होतं. तो लहानपणापासून याच विषयावरचे सिनेमा आणि व्हिडीओ पाहात असे. आम्ही त्याला फक्त प्रोत्साहन दिलं. तो पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाला याचा मला अभिमान वाटतो,' असं हर्षदचे वडील संजय परदेसी यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments