डोंबिवली येथील पूर्व भागातील आयरे गाव परिसरातील चाळींमध्ये दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे.
डोंबिवली- येथील पूर्व भागातील आयरे गाव परिसरातील चाळींमध्ये दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे. दोन दिवसांपासून घरातील पाणी उपसून रहिवासी हैराण झाले आहेत. आयरे भागातून खाडीकडे जाणारे नाले, गटारे, ओहळ भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून बंद केल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे.दोन दिवसाच्या किरकोळ पावसामध्ये आयरे गाव भागातील चाळी जलमय होऊ लागल्याने मुसळधार पावसाच्या काळात या चाळींमध्ये एक ते दोन फूट पाणी शिरण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. आयरे गावातील शांताबाई चाळ चारही बाजुने पावसाच्या पाण्याने वेढली आहे. रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
आता आयरे गावातील तलाव बुजवून तेथे चाळी बांधण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. आयरे गाव परिसरात १४ बेकायदा टोलेजंग इमारती उभ्या आहेत. तत्कालीन साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला आहे अशी कारणे देऊन या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचे आयरेतील तक्रारदारांनी सांगितले.या बेकायदा बांधकामांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने गरजेपोटी या बेकायदा चाळींमध्ये घरे घेणाऱ्या नागरिकांची माफियांकडून फसवणूक होत आहे. अपुरा पाणी पुरवठा, चोरुन वीज पुरवठा आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात अशा समस्यांना या भागातील रहिवाशांना सामोरे जावे लागते.
आयरे गावातील शांताबाई निवास चाळीच्या दोन्ही बाजुला उंचवटे रस्ते आहेत. उतरावरुन येणारे पाणी थेट या चाळींमध्ये घुसते. या चाळींच्या भागातूनबाहेर जाण्यासाटी पाण्याला मार्ग नसल्याने ते चाळींच्या भागात तुंबून राहते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.या भागातील रहिवाशांनी तुबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे म्हणून पालिका अधिकाऱ्यांना पत्रे दिली आहेत. उलट अधिकारी आम्हाला घरे खाली करा म्हणून सूचना करतात, असे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
0 Comments