Chhatrapati Sambhajinagar Crime: पेशंट तपासात असलेल्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून, डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना हॉटेल कार्तिकीच्या शेजारी शांग्रिला कॉम्प्लेक्स येथे घडली. या घटनेनंतर चारही आरोपी पळून गेले.
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पेशंट तपासात असलेल्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून, डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना हॉटेल कार्तिकीच्या शेजारी शांग्रिला कॉम्प्लेक्स येथे घडली. या घटनेनंतर चारही आरोपी पळून गेले. या प्रकरणाची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेला एका लिपिकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दीपक निळकंट मसलेकर (वय ६७, रा. सिडको एन ९) हे प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा दवाखाना शांग्रिला कॉम्प्लेक्स येथे आहे. ते २२ जून रोजी रात्री साडेआठ वाजता रुग्ण तपासत असताना, दोन जण त्यांच्या केबिनमध्ये आधी घुसले. मसलेकरांनी विचारले असता, त्यांनी शिवीगाळ सुरू केली.
"रस्ता तुझ्या बापाचा आहे का? तू कसं काय आम्हाला रस्त्यावर थांबू नको," असं म्हणत त्यांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत मसलेकर यांच्या डोक्याला जखम झाली. हा गोंधळ सुरू असताना, रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसह अपार्टमेंटमधील लोक जमा होताच, या चौघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच, क्रांती चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा शोध सुरू केला. रात्री एकाला ताब्यात घेण्यात आले; तर दोन जणांना २३ जून रोजी ताब्यात घेण्यात आले, अशी माहितीही संतोष पाटील यांनी दिली.
खैरेंकडून डॉक्टरांची विचारपूस
डॉ. दीपक मसलेकर यांच्यावर गुंडानी हल्ला केल्याची माहिती मिळताच, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मसलेकरांची भेट घेतली. याशिवाय क्रांती चौक पोलीस ठाण्याला भेट देऊन गुंडांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. माजी खासदार खैरे यांच्यासोबत माजी नगरसेवक सचिन खैरे, शिवा खांडगुळे, शिवा मोधे, सचिन गोखले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments