-->

Ads

Beed News: 'प्लीज मला इथून घेऊन जावा...!'; मुलीच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर बालविवाह उघड, 30 जणांवर गुन्हे दाखल

Beed Crime News: या प्रकरणी बालविवाह लावणाऱ्या मुला-मुलीचे आई-वडील, मामा-मामी, फोटोग्राफर आणि मंडपवाल्यासह 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



Beed Crime News: बीड  तालुक्यातील कुटेवाडी येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह  लावण्यात आला होता. त्यानंतर या मुलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन माझं जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं आहे, मला मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, अशी पोस्ट करत मदत मागितली होती. त्यानंतर बीडच्या ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली असून, या प्रकरणी बालविवाह लावणाऱ्या मुला-मुलीचे आई-वडील, मामा-मामी, फोटोग्राफर आणि मंडपवाल्यासह 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी मुलीचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला होता. त्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून तिला सतत मारहाण केली जायची आणि त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात येत होत्या. रोजच्या या त्रासाला कंटाळून या मुलीने थेट इन्स्टाग्रामवर मदतीसाठी पोस्ट केली. दरम्यान याची माहिती बीड पोलीस आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलीची सुटका करुन तिची रवानगी बालगृहात केली, असून बालविवाह लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? 

बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील एका 17 वर्षीय मुलीचा पालवण येथील प्रदीप मस्के याच्याशी 17 जून रोजी बालविवाह झाला. मात्र मुलीची इच्छा नसताना हा विवाह लावण्यात आला होता. घरच्यांनी जबरदस्ती करुन विवाह केल्याची पोस्ट संबंधित मुलीने इन्स्टाग्रामवर केली. त्याची दखल घेत बीड ग्रामीण पोलिसांनी लागलीच 18 जून रोजी तिची सुटका केली. यानंतर ग्रामसेवक दत्तात्रय लोमटे यांच्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत

काय होते पोस्टमध्ये....

सर मी.... माझे काल जबरदस्ती लग्न केले. मला खूप मारलंय. नाही लग्न केलं तर मारुन टाकीन अशा धमक्या देऊन जबरदस्ती करुन माझे लग्न केलंय... प्लीज मला वाचवा... पालवण गावात मस्के सोबत लग्न केलंय माझं... मी तुम्हाला सांगितलं असं सांगू नका.... मला मारुन टाकतील.... मला इथून घेऊन जावा... प्लीज... मी कंप्लेंट करेन म्हणून मामांनी फोन जप्त केला. एकाच दिवसात लग्न केले... खूप त्रास दिलाय मला... प्लीज मला इथून घेऊन जावा...!

Post a Comment

0 Comments