-->

Ads

भरधाव कार घुसली रसवंतीगृहात, अकरा वर्षांच्या मुलाचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

 

रसवंतीगृहात वडिलांसोबत समर्थ बसला होता. तेव्हा अचानक भरधाव कार रसवंतीगृहात घुसली.





    सांगली, 27 मार्च : पलूस तालुक्यात एक भरधाव कार रसवंतीगृहात घुसून भीषण अपघात झाला. खंडोबाचीवाडी इथे झालेल्या या अपघातात एका अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. समर्थ शिंदे असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. खंडोबाचीवाडी इथे एका पेट्रोल पंपाशेजारी रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात वडिलांसोबत समर्थ बसला होता. तेव्हा अचानक भरधाव कार रसवंतीगृहात घुसली. यामुळे रसवंतीगृहाचे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. तर चाकाखाली समर्थ चिरडला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

    भरधाव कार भिलवडी स्टेशनवरून तासगावच्या दिशेने जात होती. रविवार २६ मार्च २०२३ रोजी भरधाव वेगाने जाणारी एम एच १० सी एक्स ४०८१ मारुती सुझुकी सियाज चार चाकी गाडी रसवंती गृहात घुसली. पेट्रोल पंपाच्या समोर, रस्त्याकडेला असणाऱ्या रसवंती गृहामध्ये भरधाव वेगाने येऊन शिरली. यावेळी संतोष गोपाळ शिंदे, जयश्री संतोष शिंदे व त्यांचा मुलगा समर्थ हे या रसवंतीगृहामध्ये होते.


    गाडीचा वेग इतका होता की, गाडी रसवंतीगृहाच्या पत्र्याच्या शेडला धडकताच शेड उखडले गेले. या धडकेमध्ये रसवंती चालक संतोष गोपाळ शिंदे यांचा मुलगा समर्थ संतोष शिंदे याच्या अंगावरून गाडी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई जयश्री शिंदे या जखमी झाल्या आहेत.

    गाडी इतक्या भरधाव वेगात शिरली की, रसवंतीगृहाचे शेड उचकटून शेतामध्ये फरपटत गेले. त्याचबरोबर समर्थ यासही गाडीने फरफटत ऊसाच्या शेतामध्ये नेले. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, परिस्थितीची पाहणी करून, पंचनामा करण्याचे काम सुरू केले. सदर घटना नायरा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, मोठी गर्दी केली होती.


    सदर घटनेची फिर्याद सुरज अधिकराव शिंदे वय वर्षे ३० रा.शिंदे मळा खंडोबाचीवाडी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये त्यांनी वरील माहितीसह कार चालकाचे नाव अनिकेत जगन्नाथ चव्हाण रा.सिद्धेवाडी ता.तासगांव,जि.सांगली असे असल्याचे समजले आहे. तसेच सदरचा अपघात हा त्याच्या चुकीमुळे झाला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान संबंधित गाडी चालकास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.

    Post a Comment

    0 Comments