मुंबईत रविवारी वर्षातील सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली.
मुंबई, 13 मार्च : मुंबईत तापमान नवीन रेकॉर्ड करत असल्याचे दिसत आहे. कारण, मुंबईत रविवार हा वर्षातील सर्वात उष्ण तापमान असलेला दिवस ठरला. हवामान खात्याने रविवारी दिवसाचे तापमान 39.4 अंश सेल्सिअस नोंदवले. हे तापमान सामान्यपेक्षा सात अंशांनी जास्त आहे. त्यामुळे उष्णतेच्या बाबतीत मुंबई महाराष्ट्रात अव्वल आहे. मुंबईकरांना दिवसभर उष्णतेचा सामना करावा लागला.
मार्च महिन्यातच तापमानाचे हे रूप पाहून लोक चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दिवसाचे तसेच रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे. रविवारी रात्रीचे किमान तापमान 24.1 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. त्यामुळे दिवसा तसेच रात्री उष्णतेपासून दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.
तीन दिवसांपासून उष्णतेची लाट -
यापूर्वी प्रादेशिक हवामान विभागाने तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. शुक्रवार ते रविवार मुंबईत उष्णतेची लाट होती. हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर एखाद्या शहराचे तापमान सामान्यपेक्षा 4 अंशांनी जास्त नोंदवले गेले तर उष्णतेची लाट मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे तापमान सामान्यपेक्षा 5 ते 6 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून मुंबईत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तापमानात घट अपेक्षित आहे. कोकणातील अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे. यासोबतच वाऱ्याच्या पॅटर्नमध्येही बदल दिसू शकतो ज्यामुळे तापमानात घट होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. यापूर्वी 6 मार्च रोजी शहराचे कमाल तापमान 39.3 अंश इतके नोंदवले गेले होते.
0 Comments