२३ मार्च पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी
पेढे वाटून व्यक्त करण्यात आला आनंद
पालघर - जिल्हा परिषदे अंतर्गत सन २०१७ सालापासून अनुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जाणीव पूर्वक दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे ह्यांनी अनुकंपा व १० टक्के कर्मचाऱ्यांमधून समायोजनाच्या प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनानंतर आता जिल्हापरिषदेने २३ मार्च पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी चार तपासणी टीम तयार केल्यामुळे अनुकंपा धारकांचा मार्ग मोकळा झाल्याने पेढे वाटून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
पालघर जिल्हा परिषदेमधील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी हक्काची अनुकंपा भरती फक्त आणि फक्त उमेदवाराकडून आर्थिक व्यवहार न करता आल्याने प्रशासनाकडून जाणीवपूर्वक या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील अनुकंपा मधील लाभार्थ्यांना दिरंगाईस सामोरे जावे लागत होते.पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनुकंपा भरती प्रक्रिया पुढे जात न्हवती. ह्या भरतीसाठी २ लाख रुपयांची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात असल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे एकाही उमेदवाराने भरती प्रक्रिये दरम्यान कुणाला एक पैसाही देऊ नये अशी सक्त ताकीद उमेदवारांना दिली होती.
सन २०१७ पासून जिल्हा परिषदेत अनुकंपा भरतीच करण्यात आलेली नाही.ह्या अनुकंपा भरतीत अनियमितता आणि गैरव्यवहार झाले असून तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन विभाग) यांच्यासह त्यांच्या साथीदारा विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.त्यानंतर अनुकंपा भरतीच झालेली नसल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा या जिल्हा परिषद प्रशासन दिरंगाई मुळे जास्त झाल्याने त्यांना नोकरीस कायमचे मुकावे लागण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे कुटुंब सदस्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर कोसळलेले संकट तर दुसरीकडे पात्र उमेदवाराला पेन्शनच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे ह्यानी हा विषय सरकारकडे लावून धरला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे सततच्या पाठपुराव्या नंतर त्यांच्या आदेशाने अखेर सन 2022 अखेर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध एकूण 116 पदांपैकी सन 2017 मध्ये अनुकंपा तत्त्वावर नियुक्त दिलेले 49 कर्मचाऱ्यांपैकी 37 कर्मचारी तसेच १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यासाठी उपलब्ध एकूण 133 पदांपैकी सन 2017 मध्ये १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून नेमणूक दिलेले २८ कर्मचारी या अतिरिक्त भरलेल्या पदावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यास मान्यता देत असल्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले होते.त्या अनुषंगाने मंगळवारी निलेश सांबरे,जिपचे आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे,माजी उपाध्यक्ष तथा सदस्य शिवा सांबरे ह्यांच्या सह अनुकंपाच्या लाभार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेत अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १ ते २५ उमेदवारांसाठी २३ मार्च ते २६ मार्च, २६ ते ५० उमेदवारांसाठी २४ मार्च, ५१ ते ७५ वरील उमेदवारांसाठी २५ मार्च तर ७६ ते १०० उमेदवारांसाठी २६ मार्च रोजी अश्या २५-२५ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी चार टीमची नेमणूक करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी २३ ते २६ मार्च या कालावधीत जिल्हा परिषदेच्या रूम नंबर 103 या कार्यालयात उपस्थित राहून आपली शैक्षणिक अहर्ता, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राच्या मूळ प्रति व एक छायांकित प्रतिसह उपस्थित रहावे असे पत्र रवींद्र शिंदे यांनी जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना दिल्याने आता अनुकंपा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 Comments