-->

Ads

राज्यात मरण स्वस्त झालंय का? मंत्रालयासमोर वर्षभरात 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, दोघांचा मृत्यू

आकडेवारी पाहिल्यावर महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीचा अंदाज येत आहे.





    मुंबई, 30 मार्च : राज्यातील अनेक जणांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात सारखे खेटे घालावे लागत असतात. वाट पाहूनही समस्या सुटत नसल्याचे पाहून अनेक जण मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न करतात. गेल्या काही महिन्यात मंत्रालयासमोरील आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मार्च 2022 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये एकूण किती जणांनी आत्महत्या घेतला, याचा आढावा न्यूज 18 लोकमत डिजिटलने घेतला आहे. आकडेवारी पाहिल्यावर महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीचा अंदाज येत आहे.


    मृत शीतल गादेकर यांचे वय 63 होते. ही महिला धुळ्यातून मुंबईला आली होती. तिच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात नऊ गुंठ्याचा प्लॉट (नंबर पी-16) आहे. तो 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करून बोगस खोटी नोटरी बनवून नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावावर केला. तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विनाकायदेशीर खरेदी खतऐवजी 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर बोगस सह्या केल्या आणि गादेकर यांचे पती रवींद्र गाडेकर यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करत बोगस व्यक्ती उभा केला. त्याच्या माध्यमातून हा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला, अशी तक्रार शीतल गादेकर यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती.

    याबाबतचा वारंवार पाठपुरावाही त्यांनी केला. मात्र, त्याची दखल कुणीही घेतली नाही. त्यामुळे 27 मार्चला मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सरकार दरबारी त्यांची समस्या नसल्याचे पाहून त्यांनी नैराश्येतून कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तर शीतल यांनी मंत्रालयासमोर येण्यापूर्वीच अर्धा-पाऊण तास आधीच कीटकनाशक औषध घेतले असावे, असा निष्कर्ष तपासणीनंतर डॉक्टरांनी काढल्याचे सांगितले. तर शीतल यांचा विष प्राशन केल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला.

    तीन दिवसांपूर्वी दोन महिलांसह तिघांनी सोमवारी एकाच दिवशी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या तिघांपैकी धुळे येथील शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला. तर नवी मुंबईतील संगीत डवरे आणि पुण्याचे दिव्यांग रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती आहे.


    दुसरी घटना -

    संगीता डवरे या नवी मुंबई येथे राहणाऱ्या महिलेनेही कीटकनाशक पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. तिचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे जखमी डवरे यांच्यावर डॉक्टरांनी नीट उपचार केले नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार संगीता हिने नोंदवली होती. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने तिने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    तिसरी घटना -

    रमेश मोहिते या दिव्यांग व्यक्तीनेही मंत्रालयासमोरच्या रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. दिव्यांगानासुद्धा अनुदानात वाढ करून देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. परंतु, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करूनही सरकार दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा मोहिते यांचा आरोप आहे. दिव्यांगांवर सरकारकडून होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. रमेश मोहिते हे पुण्याच्या मावळ तालुक्यातील रहिवासी आहेत.

    चौथी घटना -

    दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मात्र, याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तेथे तैनात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी वेळीत या तरुणाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सुरेश मुंडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सुरेश मुंडे हे माजी सैनिक आहेत. बीड पोलीस फसवणूक प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने या माजी सैनिकाने मंत्रालयासमोर आत्महत्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

    Post a Comment

    0 Comments