-->

Ads

आईचा कुजलेला मृतदेह, दुर्गंधी लपवण्यासाठी 200 परफ्युमच्या बाटल्या; लालबाग प्रकरणात नेमकं काय घडलं?

 

लालबागमध्ये मुलीने आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे एका प्लास्टिक बॅगेत भरून फ्लॅटमध्येच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली होती.








    मुंबई, 16 मार्च : काळाचौकी पोलिसांनी मंगळवारी रात्री रिम्पल जैन हिला आई विना जैन यांच्या हत्ये प्रकरणी अटक केली. रिम्पलने तिच्या आईची डिसेंबर महिन्यात हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्लॅटवर ठेवले होते. मृतदेहाचा दुर्गंध येऊ नये यासाठी तिने २००पेक्षा जास्त परफ्यूम आणि एअर फ्रेशनर्सच्या बाटल्या वापरल्या. पोलिसांनी अशीही माहिती दिली की, रिम्पलचे शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध नाहीत. ती काही आठवडे खिडकीत बसून लालबाग नाक्यावर दिसत असलेलं ट्राफिक पाहत बसायची.

    रिंपलकडे शेजारी तिच्या आईबाबतही चौकशी करायचे. आई कुठे गेलीय असं विचारलं की नेहमी ठरलेलं उत्तर द्यायची. त्यात आई कानपूरला फिरायला गेली असल्याचं रिंपल सांगायची. वीना यांची रिंपल एकुलती एक मुलगी होती. दोघीही गेल्या १६ वर्षांपासून इब्राहिम कासम चाळीत राहत होत्या.


    रिंपलची चुलत बहीण तिच्या आईला पैसे देण्यासाठी नियमितपणे यायची. ती आल्यानंतर हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला. रिंपलची चुलत बहीण घरी आल्यानंतरही तिने अर्धवट दरवाजा उघडून पैसे घेण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा बहिणीने तिला वीना कुठे आहे विचारलं. त्यावेळी रिंपलने तिलाही आई कानपूरला फिरायला गेल्याचं सांगितलं. हे ऐकल्यावर रिंपलच्या बहिणीला शंका आली आणि तिने आपल्या आईसह इतर नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईक आल्यावर रिंपलने दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यावेळी रिंपलच्या काकूने तिच्या मुलाला बोलावून घेतलं.


    अखेर पोलिसांकडे रिंपलला नेण्यात आले आणि पोलिसांनी रिंपलकडे चौकशी केल्यानंतर थेट फ्लॅटवर तपास करण्यासाठी तिला घेऊन गेले. पोलिसांचे पथक फ्लॅटवर पोहचले तेव्हा त्यांना दुर्गंध पसरल्याचं जाणवलं. जेव्हा कोपऱ्यात ठेवलेल्या पिंपाचे झाकण उघडले तेव्हा तो वास तीव्र झाला. त्यात प्लास्टिकच्या बॅगेत कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना पिंपातील बॅगेत हात, पायाचे तुकडे आढळून आले. याशिवाय फ्लॅटमध्ये इलेक्ट्रिक मार्बल कटर, चाकूही सापडला. मृतदेह केईएम रुग्णालयात नेण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह वीना जैन यांचा असल्याचं ओळखलं असल्याची माहिती डीसीपी प्रविण मुंढे यांनी दिली.


    संशयित रिंपल तिचे जबाब सतत बदलत आहे. मात्र घटनास्थळी आढळलेल्या पुराव्याच्या आधारे तिच्यावर हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वीना यांची हत्या केल्यानंतर मृतदेह ठेवलेल्या पिंपावर रिंपलने मोठ्या प्रमाणावर परफ्यूम मारला होता. यासाठी तिने शेजारच्या दुकानातून परफ्यूमच्या २०० बाटल्या खरेदी केल्या होत्या. ज्यावेळी जेवण आणण्यासाठी ती बाहेर जायची तेव्हा शेजारी तिच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत तक्रार करायचे. तेव्हा तिने अधिकचे एअर फ्रेशनर्स घरी आणून ठेवले. शेजाऱ्यांकडून सतत विचारणा सुरू झाल्यानंतर रिंपलने घरातून बाहेर जायचंही कमी केलं. केवळं शौचालयासाठी ती घरातून बाहेर जायची.

    वीना जैन यांचे भाई सुरेशकुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण वीना यांना २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भेटले होते. तर परिसरातील दोघांनी वीना यांना २७ डिसेंबर रोजी पाहिल्याचं सांगितलं. त्या अपघाताने पहिल्या मजल्यावरून पडल्या होत्या. तेव्हा वीना यांना डोक्याला जखमही झाली होती. त्यावेळी रिंपलने वीना यांना रुग्णालयात नेण्यासही नकार दिला होता.

    Post a Comment

    0 Comments