दादरमधील शिवसेना भवन ठाकरेंकडे राहणार आहे. पण शिवसेना शाखांवरून दोन्ही गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, 18 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. काल (दि.17) शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्हीही शिंदेची असल्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान यानंतर शिंदे गटाकडून आता नवी खेळी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या असलेल्या शाखांवर ताबा घेण्याचे काम सुरू झाले आहे. यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होतानाही दिसत आहेत. दरम्यान आता दादरमधील शिवसेना भवन ठाकरेंकडे राहणार की शिंदेंकडे जाणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील शिवसेना भवन ठाकरेंकडे राहणार आहे. पण शिवसेना शाखांवरून दोन्ही गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. काल दापोलीत शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून जोरदार वाद झाल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान याचे पडसाद आता मुंबईतही दिसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून थेट ताबा घेण्याचे काम सुरू असल्याने मोठे वाद होताना दिसत आहेत. पुढचे काही दिवस हा प्रकार दिसण्याची शक्यता आहे.
कायद्यानुसार, शिवसेना भवन ही इमारत अधिकृत शिवसेना पक्षाच्या नावावर नसून शिवाई ट्रस्टची आहे. शाखांमुळे संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे सामना मुखपत्र आणि मार्मिक प्रबोधन प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित केले जाते. त्यामुळे यावर शिंदे गट दावा करू शकत नाहीत. मात्र मुंबईतील अनेक शाखांवर शिंदे गट दावा सांगण्याची शक्यता आहे.
मुंबईत 227 प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक शाखा आहेत, या शाखा शिंदे गट मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि यामधून देखील दोन्ही गटात वाद होऊ शकतो. त्याच पद्धतीने मंत्रालयाच्या बाजूला शिवालय कार्यालयावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हा वाद आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले
आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत जिथे सरकारची दादागिरी चालली आहे. अगदी न्याययंत्रणासुद्धा आपल्या दबावाखाली कशी येईल याच्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री आणि त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. असंच सुरू राहिलं तर लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत असं बोलण्याचं धाडस पंतप्रधानांनी दाखवायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आजचा निर्णय हा अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोवर निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये असं आम्ही म्हणत होतो. पक्ष कुणाचा हे केवळ आणि केवळ निवडून आलेल्या आमदार, खासदारांच्या जोरावर ठरवलं तर कुणीही धनाढ्य माणूस या आमदार, खासदारांना विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा , मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
0 Comments