-->

Ads

Bhagatsinh Koshyari Resign : मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

 महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.




    मुंबई, 12 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान राज्यपालांवर विरोधकांनी टीकाही केली होती.

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 13 राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सीपी राधाकृष्णन, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेकदा असंतोष धुमसला. थेट युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

    केंद्रावरही भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे.

    Post a Comment

    0 Comments