नवी दिल्ली, 15 डिसेंबर : दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आरोपी आफताब याच्याविरुद्ध पोलिसांकडे आता मजबूत पुरावे आले आहेत. दिल्ली आणि गुरुग्राममधल्या जंगलात मिळालेली हाडं श्रद्धाचीच असल्याचं डीएनए चाचणीत सिद्ध झालं आहे. मिळालेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या नमुन्याशी जुळतो आहे का याबाबत सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आता मिळाला आहे. त्यामुळे आता आरोपी आफताब पूनावाला याच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी मदत होऊ शकेल.
दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हे हत्याकांड उघडकीस आलं. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याच्यावर श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून विविध भागात फेकल्याचा आरोप आहे. तिची हत्या करून त्यानं आधी ते तुकडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले व टप्प्याटप्प्याने ते विविध भागांत फेकले. आरोपी आफताबला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिल्ली आणि गुरुग्रामच्या जंगलात मिळालेल्या हाडांची डीएनए चाचणी करून ती श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळते आहे का, हे तपासण्यासाठी रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठवले होते. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने ते रिपोर्ट दिले आहेत. जंगलात मिळालेली हाडं श्रद्धाचीच असल्याचं या रिपोर्टवरून सिद्ध झालं आहे. या रिपोर्टमुळे श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या खटल्याला वेग मिळू शकतो.
आरोपी आफताबची नार्को चाचणी घेण्यात आली असून, पॉलिग्राफ चाचणीचा रिपोर्ट आला आहे. हा रिपोर्ट साउथ दिल्ली मेहरौली पोलीस ठाण्यात पाठवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रोहिणी एफएसएलकडून हा रिपोर्ट तयार झाला आहे; मात्र पोलिसांकडून अजून त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही.
आरोपी आफताब याने याआधी पोलिसांना चौकशीमध्ये अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. पॉलिग्राफ चाचणीमध्येही त्याने बऱ्याचशा त्याच गोष्टी सांगितल्या आहेत. तरीही या रिपोर्टमध्ये पोलिसांना अनेक नव्या गोष्टीही समजल्या असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पुरावे म्हणून सादर करण्यासाठी पोलिसांच्या दृष्टीने हे रिपोर्ट महत्त्वाचे आहेत. आरोपीने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबाला फारसं महत्त्व नसतं. म्हणूनच केसला मजबूत करण्यासाठी असे चाचण्यांचे रिपोर्ट महत्त्वाचे ठरतात. येत्या एक-दोन दिवसांत नार्को चाचणीचे रिपोर्टही मिळतील अशी शक्यता आहे.
आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होते. आरोपीने अतिशय क्रूरतेने श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. नंतर ते विविध भागांत फेकून दिले. श्रद्धाच्या वडिलांच्या पाठपुराव्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं होतं.
0 Comments