भारतीय व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले पैसे एका मेडिकल ट्रेडिंग कंपनीकडून चुकून ट्रान्स्फर झाले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, दुबईत राहत असलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये 5.70 लाख दिनार (1.2 कोटी रुपये) ट्रान्स्फर झाले होते. त्या पैशातून त्याने घरभाडं दिलं व इतर खर्च केला. त्यानंतर एक कंपनी त्याला वारंवार पैसे परत करण्यास सांगत होती. बँक खात्यामध्ये चुकून पैसे ट्रान्स्फर झाल्याचा दावा या कंपनीने केला होता; पण त्याचा कंपनीवर विश्वास नसल्याने या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित कंपनीने हे प्रकरण न्यायालयात नेलं.
भारतीय व्यक्तीच्या खात्यात जमा झालेले पैसे एका मेडिकल ट्रेडिंग कंपनीकडून चुकून ट्रान्स्फर झाले होते. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने न्यायाधीशांना सांगितलं, की तो त्याच्या सप्लायरला पैसे ट्रान्स्फर करत होता; पण चुकून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले. पैसे कोणत्या खात्यात जमा झाले याचा शोध घेतल्यानंतर या भारतीय व्यक्तीचं नाव समोर आलं. कंपनीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली; पण संबंधित भारतीय व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित कंपनीने अल रफाह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या प्रकरणामध्ये संबंधित भारतीय व्यक्ती दोषी ठरली असून दुबई क्रिमिनल कोर्टानं या खात्यात जमा झालेल्या रकमेइतका दंड भरण्यास सांगितलं आहे. शिवाय, एक महिन्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला हद्दपार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या व्यक्तीचं नाव उघड झालेलं नाही. त्याने स्वत:च्या बचावात न्यायालयाला सांगितलं, की आपल्याला पैसे ट्रान्स्फर झाल्याचं नोटिफिकेशन मिळालं होतं; पण पैसे कोठून आले याची कल्पना नव्हती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचं बँक खातं गोठवण्यात आलं आहे. त्यानं न्यायालयात आपल्यावरचा आरोप मान्य केला आणि कंपनीचे पैसे परत करण्यासाठी वेळ मागितली. न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. या व्यक्तीने आता निकालाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील केलं असून, पुढच्या महिन्यात सुनावणी अपेक्षित आहे.
0 Comments