राजविंदर मूळचा पंजाबमधील मोगामधल्या बट्टर कलानचा रहिवासी असून, दोन दशकांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेला होता.
21 ऑक्टोबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड राज्यातल्या केर्न्सच्या उत्तरेकडच्या वांगेट्टी बीचवर टोयाह कॉर्डिंग्ले कुत्र्याला घेऊन फिरत होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर 12-16 तासांनी तिचे वडील आणि पोलिसांना तिचा मृतदेह सापडला. तिचा अर्धा मृतदेह वाळूमध्ये पुरला होता आणि तिच्या शरीरावर मोठ्या जखमांचे व्रण होते. तिचा गळाही आवळण्यात आला होता. टोयाह फार्मसीमध्ये काम करायची आणि तिने प्राण्यांच्या रेफ्युजी सेंटरमध्येही काम केलं होतं. आरोपी राजविंदर आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर त्या बीचवर गेला होता. त्या वेळी त्याच्याकडे स्वयंपाकघरातला चाकू आणि काही फळं होती, असं राजविंदरची चौकशी करणार्या दिल्ली पोलिसांनी सांगितलं.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टोयाह कॉर्डिंग्लेचा कुत्रा राजविंदरवर भुंकला. त्यामुळे तो चिडला आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर त्याने तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले, मृतदेह वाळूत पुरला आणि घरी परतण्यापूर्वी कुत्र्याला झाडाला बांधलं. ही घटना इनिसफेल शहरात घडली होती. घरी गेल्यावर त्याने आपला पासपोर्ट घेतला आणि 23 ऑक्टोबर 2018 रोजी तो भारतात निघून आला.
राजविंदर सिंग ऑस्ट्रेलियामध्ये नर्स म्हणून काम करायचा. केर्न्स परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर त्याच्यावर संशय बळावला. त्याच्या घरापासून बऱ्याच दूर असलेल्या बीचवर तो दिसल्याने या प्रकरणात तो तपास अधिकाऱ्यांसाठी 'पर्सन ऑफ इंटरेस्ट' बनला. दरम्यान, राजविंदर आपली पत्नी आणि तीन मुलांना तिथेच सोडून देश सोडून पळून गेला, असं सूत्रांनी सांगितलं.
मार्च 2021मध्ये, ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य संशयित राजविंदरचं प्रत्यार्पण करण्यासाठी त्यांच्या भारतीय समकक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. इंटरपोलने राजविंदरविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. नंतर भारतीय अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये विनंती मान्य केली. भारतात पंजाब पोलिसांनी त्याचा शोध घेतला; पण तो लपण्याची ठिकाणं बदलत होता. काही काळासाठी सेवादार म्हणून गुरुद्वारामध्ये राहिला होता, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
4 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन हाय कमिशनने त्याच्या अटकेसाठी आवश्यक माहिती देणाऱ्यांना 1 मिलियन डॉलर्सचं बक्षीस देण्यात येईल, असं जाहीर केलं. तसंच क्वीन्सलँड पोलिसांनी सिंग विमानतळावर फिरतानाचं फुटेजही प्रसिद्ध केलं. 'इंटरपोलने राजविंदरविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सीबीआय आणि इंटरपोल यांचा प्रकरणाच्या तपासात सहभाग होता. 21 नोव्हेंबर रोजी पटियाला हाउस कोर्टातून राजविंदरविरोधात प्रत्यार्पण कायद्यांतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं. नंतर सीबीआय आणि इतर एजन्सीकडून माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली,' असं दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं.
'तो त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हता; पण काही मित्रांच्या संपर्कात होता आणि आम्ही त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली,' असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. 'शुक्रवारी (25 नोव्हेंबर) सकाळी 6 वाजता सीबीआय, इंटरपोल आणि ऑस्ट्रेलियन समकक्ष अधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या इन्पुटच्या आधारे, इंटेलिजन्स-बेस्ड ऑपरेशनअंतर्गत आरोपीला पकडण्यात आलं. उत्तर दिल्लीतल्या जीटी कर्नाल रोडवरून त्याला अटक करण्यात आली. पुढच्या कार्यवाहीसाठी त्याला कायद्यानुसार संबंधित न्यायालयात हजर केलं जात आहे,' असं दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं. त्याला पकडणाऱ्या टीममध्ये इन्स्पेक्टर विक्रम दहिया आणि निशांत दहिया यांचा समावेश होता.
या प्रकरणी राजविंदरचं ऑस्ट्रेलियाला प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तो मूळचा पंजाबमधील मोगामधल्या बट्टर कलानचा रहिवासी असून, दोन दशकांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेला होता. 'तो त्याची पत्नी किंवा मुलांच्या संपर्कात नव्हता. त्याचे आई-वडील पंजाबमध्ये राहतात; पण तो त्यांच्याही संपर्कात नव्हता असं आम्हाला आढळलं आहे. पंजाब आणि दिल्लीत तो वारंवार आपली लपण्याची ठिकाणं बदलत होता. आमच्या टीमने त्याला अटक केली तेव्हा तो उत्तर दिल्लीत प्रवासामध्ये होता. अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने आपला लूक बदलला होता. त्याची चौकशी करून त्याला न्यायालयात हजर केलं जात आहे,' असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
0 Comments