-->

Ads

2 राज्यांचे पोलीस शोधत आहेत चोरीला गेलेली चप्पल; नेमकं प्रकरण तरी काय?


 सोन्याचे दागिने, पैसे किंवा अशा काही मौल्यवान वस्तूंची चोरी झाली की आपण पोलिसात तक्रार देतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका तरुणाने चक्क आपल्या चप्पल चोरीचीही पोलिसात तक्रार दिली आहे. त्यातही आश्चर्य म्हणजे पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली. एक नव्हे तर दोन-दोन राज्यांचे पोलीस या एका तरुणाची चप्पल आणि ती चोरणाऱ्या चोराला शोधत आहेत. बिहारमधील चोरीचं हे विचित्र प्रकरण आहे.

मंदिराबाहेर चप्पल चोरीची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. तुम्ही रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास केला असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये होणाऱ्या चप्पल चोरीबाबतही माहिती असेल. चप्पल चोरीची पोलिसात तक्रार करणाऱ्या या तरुणाची चप्पलही अशीच रेल्वे प्रवास गेली. राहुल कुमार झा असं या मुलाचं नाव.

बिहारच्या सीतामढीमध्ये राहणारा 23 वर्षांचा राहुल ट्रेनने प्रवास करत होता. त्याला ट्रेनमध्ये झोप लागली. उठल्यानंतर त्याने पाहिलं तर त्याच्या चपला गायब होत्या. त्याने ट्रेनमध्ये शक्य तिथं चपला शोधल्या पण त्याला काही सापडल्या नाहीत. अखेर त्याने पोलिसात याची तक्रार दिली. आधी अॅपमार्फत आणि नंतर लिखित तक्रार केली. मुजफ्फरपूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याने चपला चोरीची तक्रार नोंदवली.

राहुलने दिलेल्या लिखित तक्रारीनुसार 28 ऑक्टोबर रोजी तो 04652 क्रमांकाच्या रेल्वेत कोच बी-4 बर्थ, नंबर-51 सीटव होता. अंबालाहून मुजफ्फरपूर जंक्शला जात होता. मुरादाबाद जंक्शनहून गाडी थोडी पुढे गेल्यानंतर मध्यरात्री 12 च्या सुमारास तो झोपला. त्याला जाग आली तेव्हा बर्थच्या खाली त्याच्या चपला नव्हत्या. या तक्रारीत त्याने चपलांबाबत माहितीही दिली आहे. तसंच रेल मदतवर तक्रार केल्याचंही सांगितलं आहे. त्या तक्रारीचा नंबरही त्याने दिला आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती त्याने केली आहे.

तरुणाची ही तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. आश्चर्य म्हणजे ट्रेनमधून चोरी झालेल्या या चपला दोन राज्यांचे पोलीस  शोधत आहेत. यूपी आणि बिहार दोन्ही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत चोरीबाबत काही माहिती मिळालेली नाही.

आज तकच्या वृत्तानुसार पोलीस दिनेश कुमार साहू म्हणाले की राहुल कुमार झा नावाच्या या प्रवाशाच्या चप्पल चोरीची प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. चप्पल शोधण्याचे आणि चोरांना पकडण्याचे प्रयत्न सरू आहेत.


Post a Comment

0 Comments