पर्थमध्ये रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुपर 12 फेरीतील सामना पार पडला. ग्रुप 2 मधल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 5 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला. पण सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 15व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. पाठीच्या दुखण्यामुळे कार्तिक मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर रिषभ पंतनं उर्वरित ओव्हर्समध्ये विकेट किपिंग केली.
मॅच संपल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं कार्तिकच्या दुखापतीसंदर्भात अपडेट दिली. भुवीनं म्हटलंय की पाठीच्या दुखापतीमुळे कार्तिकला मैदान सोडावं लागलं. पण फिजिओच्या रिपोर्टनंतरच त्याच्या दुखापतीचं स्वरुप काय आहे हे स्पष्ट होईल.' दरम्यान टीम इंडिया आपला पुढचा सामना 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धचा हा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा ठरणार आहे. पण या सामन्यात दिनेश कार्तिक खेळू शकला नाही तर पहिल्यांदाच यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रिषभ पंतला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.
दरम्यान लुंगी एनगिडीच्या 4 विकेट्स आणि डेव्हिड मिलर-एडन मारक्रम या जोडीनं केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या झुंजार खेळीमुळे भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या ओव्हरमध्ये 2 बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. ग्रुप 2 च्या पॉईंट टेबलमध्ये सध्या दक्षिण आफ्रिका 5 पॉईंटसह नंबर एकवर आहे. तर टीम इंडिया 4 पॉईंटसह दुसऱ्या नंबरवर आहे.
0 Comments