श्रीनगर 04 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. लोहिया यांच्या हत्येतील मुख्य आरोपी त्यांचा नोकर यासिरच असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तो रामबनचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचं वागणं अतिशय आक्रमक होतं आणि तो डिप्रेशनमध्ये होता. एवढंच नाही तर त्याची एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये त्याने अनेक कविताही लिहिल्या आहेत.
जम्मू ADGP मुकेश सिंह यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात नोकर यासिर अहमद हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं आहे. त्याचं वागणं खूपच आक्रमक होतं आणि सूत्रांनुसार तो डिप्रेशनमध्येही होता. ते म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात कोणताही दहशतवादी अँगल समोर आलेला नाही. मात्र, याची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे. हत्येसाठी वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की अशी काही कागदपत्रं सापडली आहेत, ज्यावरून यासिरची मानसिक स्थिती दिसून येते.
पोलिसांनी परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले आहेत. यामध्ये आरोपी घटनेनंतर पळताना दिसत आहे. तो गेल्या ६ महिन्यांपासून हेमंत लोहिया यांच्या घरी काम करत होता. पोलिसांनी आरोपीचा फोटोही जारी केला आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून एक डायरी सापडली आहे. यामध्ये आरोपीने शायरी लिहिली आहे. या शायरीमध्ये त्याने आपलं आयुष्य संपवण्याबाबतही संकेत दिले आहेत. त्याने एका शायरीमध्ये लिहिलं होतं, "आम्ही बुडत असू तर बुडू द्या, आम्ही मरत असू तर मरू द्या, पण आता काही खोटेपणा दाखवू नका."
हेमंत लोहिया यांचा मृतदेह जम्मूच्या उदयवाला येथे त्यांच्या मित्राच्या घरी सापडला. जिथे ते राहत होते. त्यांचा गळा चिरून खून करण्यात आला. याशिवाय त्यांच्या शरीरावर जखमा आणि भाजण्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, आरोपीनी लोहियांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
0 Comments