राज्यभरातील अनेक शहरांमध्ये चोरीच्या अनेक घटना दररोज घडतात. मात्र, यातील काही चोरांची चोरी करण्याची पद्धत इतकी वेगळी असते, की ती चर्चेचा विषय ठरते. नुकतंच पुण्यातून अशाच एका आंतरराज्यीय टोळीचा भांडाफोड झाला आहे. बाणेर परिसरात 10 पेक्षा जास्त घरफोड्या करणाऱ्या या टोळीला चतुःश्रृंगी पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मध्यप्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. ही टोळी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरी करायची. यांची चोरी करण्याची पद्धत अतिशय वेगळी होती. हे चोरटे नदीपात्रालगत असलेल्या सोसायटीच्या परिसरात थांबत असत. यावेळी मच्छर चावू नये यासाठी ते अंगाला लोशन लावत असत. यासोबतच आपल्याला कोणी ओळखावं नाही, यासाठी ते अंगाला चिखलही लावत असे.
संपूर्ण डाव आखून रात्र होताच ते सोसायटीच्या कंपाऊंडच्या तारा तोडायचे आणि यानंतर बंद असलेल्या फ्लॅटमध्ये जात चोरी करायचे. यानंतर ते चोरी केलेला माल मध्यप्रदेशात पाठवून द्यायचे. जेणेकरून पोलिसांना याचा सुगावा लागू नये. या चोरट्यांनी अतिशय सावधिगिरी बाळगली होती. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते मोबाईलही वापरत नसे आणि चोरी केल्यावर पायीच चालत जायचे.
मात्र चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अखेर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी पोलीस तब्बल दोन आठवडे पहाटेच्यावेळी साध्या वेशात गस्त घालत होते. अखेर चतुःश्रृंगी ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरफोडी करून पळत असताना या चोरांना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाखाचा मुद्देमालही जप्त केला आहे.
0 Comments