या बैठकीनंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई, 17 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीआधीच पडद्याआड घडामोडींना वेग आला आहे. रात्रभर भाजपने जोरबैठक घेतल्यानंतर आता भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. या बैठकीनंतर अंधेरी निवडणुकीत लढण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आज पोटनिवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे भाजप काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली
आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. ११.३० वाजता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्वच्या या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत बरेच ट्विस्ट आले. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई महापालिकेत कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला, पण त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. अखेर हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर मुंबई महापालिकेला ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारावा लागला, त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला.
रविवारी राज ठाकरे यांच्या या पत्रानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचीमागणी केली. उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. आमदार प्रताप सरनाईक यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजप काय निर्णय घेणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
0 Comments