-->

Ads

PUNE NEWS | पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं


 पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या सहा महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिलंय. अतिशय वेदनादायक ही घटना आहे. संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतक बालकाची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. आपल्या बालकाला रुग्णालयात घेवून जाण्याचा प्रवास हा त्याच्यासोबतचा शेवटचा प्रवास असेल अशी त्यांना कल्पनादेखील नसेल. पण दुर्देवाने अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं. बालकाला रुग्णालयात घेवून जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने घात केला. खरंतर ती ट्रॅक्टर चालकाची चूक होती का पोलीस तपासाचा भार आहे. मृतक बालकाचे आई-वडील दुचाकीने रस्त्याने जात असताना त्यांनी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरला पुढे जाण्यासाठी जागा दिली. पण इथेच घात झाला. ट्रॅक्टर पुढे निघून गेलं. पण त्याची ट्रॉली राहिली होती. ट्रॅक्टर पुढे जात असताना ट्रॉलीचा धक्का बसला आणि आईच्या हातून बाळ खाली पडलं. त्यानंतर ते बाळ थेट ट्रॉलीच्या चाकाच्या खाली चिरडलं गेलं. ही घटना इतकी वेगाने घडली की रस्त्यावरच्या कुणालाच काही समजलं नाही.

बाळाच्या अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली पुढे निघून गेल्यानंतर आईने रडत आपल्या लेकराला उचललं आणि त्याला कवटाळून छातीशी घेतलं. त्याला गोंजारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची दुचाकी खाली पडली होती. रस्त्यावर ये-जा करणारे नागरीक त्यांच्याकडे गेले. त्यांनी दाम्पत्याला बाळासह रस्त्याच्या बाजूला नेलं. बाळाला तातडीने रुग्णालयात नेलं गेलं. पण बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

काही घटना आपल्या हातात नसतात, असं म्हणतात. अनेकदा आपण जर-तरचा विचार करुन अशी घटना घडलीच नसती असे अनेक अंदाज बांधतो. पण अनावधानाने आणि अनपेक्षितपणे काही विचित्र आणि वाईट दुर्घटना घडतातच. या घटना अतिशय दुखद जरी असल्या तरी त्यांना सामोरं जाणं याशिवाय आपल्या हातात दुसरा कोणताच पर्याय नसतो. संबंधित वाईट घटनेवर आपलं काळीज पिळवटून जात असलं तरी ते वास्तव असतं. त्या वास्तव्याला आपण नाकारु शकत नाही. संबंधित वाईट घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करु शकतो. पण जे घडलंय त्याला टाळू शकत नाही. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे घटना ही त्यापैकीच एक. खरंतर अतिशय कमी वेळात, डोळ्याची पापणी मिटावी इतक्या वेळेत संबंधित दुर्देवी घटना घडली आहे. रस्त्याने गाडी चालवताना खूप काळजी घेतली पाहिजे. आपला आणि आपल्या कुटुंबियांचा प्राण हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाहन चालवताना स्वत:चा आणि इतरांचा विचार करुन नियम पाळले पाहिजेत, असा बोध या घटनेतून घ्यायला हवा. 

Post a Comment

0 Comments