प्रतिनिधी :-ज्ञानेश्वर मेटकर
यवतमाळ जिल्ह्यातील 17 वर्षीय वैष्णवीला तिच्या आई - वडिलांनी उपचारांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते . मात्र , व्हेंटिलेंटर उपलब्ध नाही असे कारण देत तिथल्या डॉक्टरांनी तब्बल 20 तासांपेक्षा जास्त वेळ तिला अॅम्बू बॅगद्वारे कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलं . धक्कादायक म्हणजे या कामी आजारी तरुणीच्या आई वडिलांना लावलं . 20 तासांपेक्षा जास्त अवधी तिचे आई - वडील अॅम्बू बॅग दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते . 17 वर्षीय तरुणीवर वैष्णवी किंवा तिचे आई - वडील व्हीआयपी नसल्याने तिला अखेरपर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध झालं नाही . अखेरीस काल ( 16 सप्टेंबर ) तिने जीव सोडला .
व्हेंटिलेटर न मिळाल्याने डॉक्टरांनी अॅम्बू बॅग लावली
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वैष्णवी बागेश्वर या तरुणीला पोटाच्या आजाराच्या उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं. सुरुवातीला काही दिवस यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. मात्र तिची प्रकृती बिघडत असल्यामुळे तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. 14 सप्टेंबरच्या रात्री आई-वडील तिला घेऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोहोचले होते. तेव्हा तिची स्थिती गंभीर होती. 15 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास तिला रुग्णालयातील वॉर्डमध्ये जागा मिळाली. तिच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. मात्र तिची अवस्था पाहता तिला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र ते तिला मिळू शकलं नाही. त्यामुळे उपस्थित डॉक्टरने तिला काही वेळ कृत्रिम श्वास देण्यासाठी ॲम्बू बॅग लावली. अॅम्बू बॅग एक प्रकारचा फुगा असतो जो वारंवार दाबून रुग्णाला कृत्रिम श्वास देता येतो. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील हे जुने तंत्र काही वेळासाठीच अंमलात आणण्यासाठी असतं.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे लेकीचा मृत्यू, कुटुंबियांचा आरोप
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अनेक तास प्रतीक्षा केल्यानंतरही वैष्णवीला व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकलं नाही. परिणामी तब्बल 20 तास वैष्णवीचे आई-वडील अॅम्बू बॅगचा फुगा वारंवार दाबून आपल्या लेकीला कृत्रिम श्वास देत होते. वैष्णवीचा काल रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, अखेरपर्यंत तिला व्हेंटिलेटर उपलब्ध झालं नाही. अॅम्बू बॅग हाताने दाबून दाबून आमची जीव सोडण्याची वेळ आली होती. मात्र आमच्या लेकीला व्हेंटिलेटर मिळालं नाही असं दुःख तिच्या वडिलांनी व्यक्त केलं. तर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या लेकीचा जीव गेल्याचे आरोप वैष्णवीच्या नातेवाईकांनी केले आहे.
रुग्णालयाच्या अधिष्ठातांचा कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार
एबीपी माझाने या प्रकरणी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वैष्णवीला नागपूरात आणण्यात आलं, तेव्हाच तिची परिस्थिती फार गंभीर होती असं त्यांनी सांगितलं. मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
0 Comments